"भाजपा निवडणुकीच्या निकालाने घाबरलीय, अबकी बार... सत्ता के बाहर"; काँग्रेसचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 11:35 AM2024-03-22T11:35:25+5:302024-03-22T11:41:09+5:30
Mallikarjun Kharge Slams BJP Over Arvind Kejriwal : काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीने गुरुवारी रात्री अटक केली. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देण्यास नकार देताच ईडीचे पथक केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. केजरीवाल यांचा सुमारे दोन तास जबाब नोंदविल्यानंतर त्यांना अटक करुन ईडीच्या मुख्यालयात नेण्यात आले.
केजरीवाल यांना अटक केल्यानंतर काँग्रेसने भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपा निवडणुकीच्या निकालाने घाबरलीय, अबकी बार... सत्ता के बाहर" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "रोज विजयाचे खोटे दावे करणारी अहंकारी भाजपा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना बेकायदेशीर मार्गाने कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे" असंही म्हटलं आहे.
रोज़ जीत का झूठा दंभ भरने वाली अहंकारी भाजपा, विपक्ष को हर तरह से चुनाव के पहले ग़ैर क़ानूनी तरीक़े से कमज़ोर करने की कोशिश कर रही है।
— Mallikarjun Kharge (@kharge) March 21, 2024
अगर सच में जीत का भरोसा होता तो संवैधानिक संस्थाओं का दुरुपयोग करके मुख्य विपक्षी दल - कांग्रेस पार्टी का Accounts Freeze नहीं किया जाता ।…
काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "रोज विजयाचे खोटे दावे करणारी अहंकारी भाजपा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना सर्वप्रकारे आणि बेकायदेशीर मार्गाने कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. जर खरच विजयाचा आत्मविश्वास असता तर प्रमुख विरोधी पक्ष - काँग्रेस पक्षाची खाती घटनात्मक संस्थांचा गैरवापर करून गोठवली गेली नसती. निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य केले जात नाही."
"सत्य हे आहे की भाजपा आगामी निवडणुकीच्या निकालाने आधीच घाबरली आहे आणि घाबरून विरोधकांसाठी सर्व प्रकारच्या समस्या निर्माण करत आहे. आता बदल घडवण्याची वेळ आली आहे! अबकी बार… सत्ता के बाहर!!" असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करून भाजपा सत्तेसाठी कोणती पातळी गाठू शकते, हे स्पष्ट होते, असे शरद पवार म्हणाले. तर ही कारवाई लोकशाही संपवण्याचा कट असल्याचा आरोप झारखंड मुक्ती मोर्चाने केला.