काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मोदी सरकार बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यपूर्व काळाबद्दलच बोलतात. काँग्रेसची सरकारं पाडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "आम्ही बेरोजगारीचा मुद्दा प्रमुख मुद्दा म्हणून मांडत आहोत. यावर भाजपा कधीच बोलत नाही. केरळ, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमध्ये भेदभाव केला जात आहे. देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. गेल्या 10 वर्षांत भाजपाने 411 आमदारांना आपल्याकडे आणलं आहे. त्यांनी काँग्रेसची अनेक सरकारं पाडली. भाजपा लोकशाही संपवत आहे."
"पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा संसदेत बोलतात तेव्हा ते त्यांच्या सरकारच्या यशाबद्दल बोलतात. पण आपल्या सरकारच्या अपयशाबद्दल बोलत नाहीत. जेव्हा आपण त्यांच्या अपयशाबद्दल बोलतो तेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. यामुळेच आम्ही त्यांच्या सरकारच्या विरोधात काळी पत्रिका आणली आहे, जेणेकरून जनतेला त्यांच्या सरकारच्या अपयशाची माहिती मिळेल."
"देशातील सर्वात मोठा मुद्दा बेरोजगारीचा आहे, मात्र मोदी सरकार त्यावर कधीच बोलत नाही. ते नेहमीच 10 वर्षांची तुलना करतात, पण पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या कर्तृत्वाबद्दल कधीच सांगत नाहीत. ज्या राज्यात भाजपाचं सरकार नाही, तेथे केंद्र सरकार मनरेगाचे पैसेही देत नाही" असंही मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.