Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी होणारे मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. प्रचाराची धूम शिगेला पोहोचली असून, राजकीय वातावरणही चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप गड राखण्यात उत्सुक असून, काँग्रेस मात्र कमबॅक करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांना विषारी साप म्हणत टीका केली होती. आता यातच मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाने पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली असून, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र प्रियांक खरगे कर्नाटकात गुलबर्गा येथे एका प्रचारसभेला संबोधित करत होते. घरचा मुलगाच नालायक असेल तर घर कसे चालवणार? असे प्रियांक खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून बोलल्याचे सांगितले जात आहे. तुम्ही गुलबर्गा येथे आलात, तेव्हा तुम्ही बंजारा समाजाला काळजी करू नका, असे सांगितले होते. बनारसचा मुलगा दिल्लीत बसला आहे, अशी टीकाही प्रियांक खरगे यांनी केली.
बंजारा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण केला
पीएम मोदींनी स्वत:ला बंजारा समाजाचा मुलगा असल्याचे सांगितले. पण मुलगाच एवढा नालायक असेल तर घर कसं चालणार? स्वतःला बंजारा समाजाचे सुपुत्र म्हणवून त्यांनी बंजारा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण केला, असे प्रियांक खरगे यांनी म्हटले आहे. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर यावेळी प्रथमच प्रियांका खरगे निवडणूक लढवत आहेत. यावेळी ते चित्तापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. कर्नाटकच्या राजकारणात पुढे जाण्यासाठी हा विजय त्यांच्यासाठी यावेळी महत्त्वाचा मानला जात आहे. राजकीय विश्लेषक या निवडणुकीला त्यांची लिटमस टेस्ट म्हणत आहेत.
दरम्यान, काँग्रेसने केलेल्या टीकेचा पंतप्रधान मोदी यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. मोदीजी, तुमची कबर खोदली जाईल, अशी टीका करणारे आता माझी तुलना सापाशी करत जनतेकडून मते मागत आहेत. साप हे भगवान शंकराच्या गळ्याची शोभा आहे. माझ्यासाठी देशातील जनता हे देवाचे रूप आहे, शिवाचेच रूप आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"