Mani Shankar Aiyar, Pakistan India Dialogue: काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर अनेकदा उघडपणे पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे सरकार याविरोधात बोलताना दिसतात. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत असताना, पाकिस्तान आणि तेथील जनतेवर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले की, पाकिस्तानात असताना त्यांचे इतक्या खुल्या मनाने स्वागत झाले, तसे इतर कोणत्याही देशात झालेले नाही. डॉन वृत्तपत्राने अय्यर यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, माझ्या अनुभवानुसार, पाकिस्तानी लोक हे अशा पद्धतीचे आहेत, जे कृतीवर प्रतिक्रिया देणे पसंत करतात. त्यामुळे भारताने मैत्रीचा एक हात पुढे केला तर पाकिस्तानही मैत्रीपूर्ण प्रेमाचा वर्षाव करेल. पण भारताने पाकिस्तानशी संवादच साधला नाही ही गेल्या १० वर्षातील सर्वात मोठी चूक असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी शनिवारी लाहोरच्या अलहमरा येथे फैज महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 'हिज्र की रख, विसाल के फूल, भारत-पाकिस्तान संबंध' या सत्रादरम्यान ही टिप्पणी केली. डॉनच्या वृत्तानुसार, अय्यर म्हणाले की, जेव्हा ते कराचीमध्ये कॉन्सुल जनरल म्हणून नियुक्त झाले होते, तेव्हा प्रत्येकजण त्यांची आणि त्यांच्या पत्नीची आपुलकीने विचारपूस करायचे, काळजी घ्यायचे. त्यांनी त्यांच्या 'मेमोयर्स ऑफ अ मॅव्हरिक' या पुस्तकात अनेक घटनांबद्दल लिहिले आहे, ज्यात पाकिस्तान हा भारतीयांच्या कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळा देश असल्याचे म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी सद्भावना आवश्यक होती. पण २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या १० वर्षांत भारत-पाकिस्तान यांच्यात संवादच साधला नाही. त्यामुळे गोष्टी ताणल्या गेल्या. भारतातील सध्याचे हिंदुत्ववादी सरकार पाकिस्तानशी चर्चा करेल, अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. मी पाकिस्तानच्या जनतेला एवढेच सांगू इच्छितो की त्यांनी हे लक्षात ठेवावे की पंतप्रधान मोदींना कधीही एक तृतीयांशपेक्षा जास्त मते मिळालेली नाहीत, परंतु आमची राजकीय व्यवस्था अशी आहे की जर त्यांच्याकडे एक तृतीयांश मते असतील. तर त्यांच्याकडे दोन तृतीयांश जागा असतात. म्हणूनच दोन तृतीयांश भारतीय तुमच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास तयार आहेत असे माझे मत आहे.