मुंबई : काँग्रेस पक्ष हा ‘मन की बात’ नव्हे, तर ‘जन की बात’ करणारा पक्ष आहे. त्यामुळेच लोकांमध्ये जाऊन आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा तयार करीत आहोत. मुंबईतील सर्व स्तरातील लोकांनी दोन तासांच्या भेटीत तब्बल ६७ सूचना जाहीरनामा समितीला दिल्या असून, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्याचे निश्चित प्रतिबिंब उमटेल, असे प्रतिपादन काँग्रेस जाहीरनामा समितीचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केले.मुंबईकरांसाठी महागाई, रोजगार आणि संरक्षण हे महत्त्वाचे मुद्दे असून, तेच मोदी पर्वाचा शेवट करतील, असे भाकीतही त्यांनी वर्तवले. मुंबई काँग्रेसने जाहीरनाम्यासंदर्भात वांद्रे (प.) येथील अॅम्फी थिएटरमध्ये परिसंवाद आयोजित केला होता. मुंबई काँगेसचे अध्यक्ष संजय निरुपम, खासदार कुमार केतकर, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते. परिसंवादात ज्येष्ठ नागरिक, महिला, उद्योजक, डॉक्टर, वकील, विचारवंत, व्यावसायिक, व्यापारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.चिदंबरम म्हणाले, भाजपा सरकार हे अहंकारी सरकार आहे. लोकशाहीला न मानणाऱ्या पक्षाचे हे सरकार जुमलेबाज सरकार आहे. म्हणूनच ए.सी. केबिनमध्ये बसून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील, दोन कोटी नोकऱ्या देऊ, अशा घोषणा भाजपाने केल्या. काँग्रेस अशी खोटी आश्वासने देणार नाही.जनतेत जाऊन त्यांच्या मागण्या, अडचणी आम्ही समजून घेऊ. त्यावरील उपायांची चर्चा करून त्यांचा आमच्या जाहीरनाम्यात समावेश करू. त्यासाठीच या परिसंवादाचे आयोजन केले आहे. मुंबईकरांचे म्हणणे ऐकण्यासाठीच आम्ही आलो आहोत. तुम्ही कोणत्याही विषयावर बोलू शकता. उपाय व सूचना सुचवू शकता. अडचणी सांगू शकता, असे चिदंबरम म्हणाले.जाहीरमान्यात समस्यांचा विचार करूमुंबईतील पायाभूत सुविधा, पाणी समस्या, बेरोजगारी, महागाई, इंधनाचे वाढते दर, कचरा व्यवस्थापन व स्वच्छता, महिला संरक्षण, महिला प्रवाशांच्या समस्या, खासगीकरण, लघू व मध्यम उद्योगांच्या समस्या, जीएसटी, नोटाबंदीचे परिणाम, कोलमडलेली अर्थव्यवस्था अशा विविध समस्या व अडचणी उपस्थितांनी मांडल्या. या सर्व मागण्या ऐकल्यानंतर महागाई, रोजगार आणि संरक्षण या मुंबईकरांच्या प्रमुख समस्या असल्याचा निष्कर्ष चिदंबरम यांनी काढला. या तिन्ही समस्यांचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये सर्वांगीण विचार केला जाईल, अशी ग्वाही चिदंबरम यांनी या वेळी दिली.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असेल जनभावनांचे प्रतिबिंब- पी. चिदंबरम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 2:28 AM