ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - काँग्रेसने सोमवारी आपला १३१वा स्थापना दिवस देशभरात मोठय़ा उत्साहात साजरा केला. यानिमित्त पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पक्षाचा ध्वज फडकविला.
या वेळी उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सलमान खुश्रीद, आनंद शर्मा, शीला दीक्षित, गुलाम नबी आझाद आणि मनीष तिवारी यांच्यासह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. अकबर मार्गावरील पक्ष मुख्यालयात ध्वजारोहणानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पक्ष नेत्यांसोबत संवादही साधला.
या वेळी त्यांनी मीडियाशी मात्र चर्चा केली नाही. वेगवेगळ्या राज्यांतही पक्षाने आपल्या मुख्यालयात स्थापना दिनाचे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस स्थापना दिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सेवादलाने ध्वजाला मानवंदना दिली. या वेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व इतर नेत्यांनी सेवादलाच्या कार्यकर्त्यांसह प्रतिज्ञापत्नाचे सामूहिक वाचन केले.
काँग्रेसने सलग १३0 वर्षे देशसेवेचा वसा कायम ठेवला आहे. त्यासाठी काँग्रेसला बलिदानेही द्यावी लागली. परंतु, पक्ष आपल्या विचारधारेपासून ढळला नाही. पुढील काळातही काँग्रेसचे कार्यकर्ते देशासाठी, समाजातील वंचित घटकांसाठी काम करीत राहतील.
- खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष
वर्धापनदिनी वादाचे 'दर्शन'!
अखिल भारतीय काँग्रेसच्या १३१व्या स्थापना दिनीच मुंबई काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या 'काँग्रेस दर्शन' या मासिकात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध झाल्याने पक्षाची चांगलीच पंचायत झाली. या मुद्दय़ावरून विरोधकांनी टीकेचा सूर आळवताच मासिकाचे कंटेन्ट एडिटर सुधीर जोशी यांची हकालपट्टी करण्यात आली.
या चुकीबद्दल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी तीव्र नाराजी व दिलगिरी व्यक्त केली. 'काँग्रेसने आतापर्यंत दडवून ठेवलेले सत्य अखेर बाहेर आलेच,' अशा शब्दांत भाजपाने टीका केली.