दिल्लीमध्ये एकत्र लोकसभा निवडणूक लढवणारे काँग्रेस आणि आम आदमी पक्ष पुन्हा एकदा वेगळे झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत दिल्लीत दोन्ही पक्षांच्या झालेल्या दारूण पराभवानंतर ते पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
आम आदमी पक्षाने याला प्रत्युत्तर देत विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, तर काँग्रेसनेपाणीटंचाईच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाला कोंडीत पकडलं आणि पुढील विधानसभा निवडणुका काँग्रेस एकट्याने लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. आज काँग्रेस दिल्लीतील विविध भागात आम आदमी पक्षाविरोधात मडकी फोडून आंदोलन करणार आहे.
दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने उन्हाळ्याचे तापमान वाढत आहे त्यामुळे दिल्लीतील अनेक भागात पाणीटंचाई वाढली आहे. अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याची परिस्थिती आहे. मात्र टँकर वेळेवर येत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. काँग्रेस सकाळी 11 वाजता युसूफ सराय गोविंदपुरी आणि दिल्लीच्या जवळपास 280 ब्लॉकमध्ये आम आदमी पार्टीच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.
भाजपाने साधला काँग्रेसवर निशाणा
पाणीटंचाईवर काँग्रेसने ‘आप’च्या विरोधात आंदोलन करण्याची जी घोषणा केली आहे त्यावर भाजपाने ताशेरे ओढले आहेत. दिल्ली भाजपाचे मीडिया प्रमुख प्रवीण शंकर कपूर यांनी म्हटलं आहे की, काँग्रेसने आम आदमी पार्टीच्या विरोधात घोषणा दिल्याने, दिल्लीतील लोकांनी "नौ सौ चूहे खा कर बिल्ली हज को चली" असं म्हटलं आहे.
केवळ दहा दिवसांपूर्वी आम आदमी पक्षासोबत जय आणि वीरू यांसारखी मैत्री असल्याचं सांगणारी काँग्रेस आता त्याच आम आदमी पक्षात भ्रष्टाचार होताना दिसत असल्याचं म्हणत असल्याने दिल्लीतील जनतेला आश्चर्य वाटत असल्याचं प्रवीण शंकर कपूर यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते आता आम आदमी पक्षाला हवा तसा विरोध करण्याचं नाटक करू शकतात, पण दिल्लीतील आणि देशातील जनता ‘आप’च्या भ्रष्टाचाराची पापं माफ करणार नाही असं भाजपाने म्हटलं आहे.