प्रियंका गांधी जाणार राज्यसभेवर; छत्तीसगडमधून मिळणार उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 16:58 IST2020-02-17T16:55:07+5:302020-02-17T16:58:52+5:30
सत्तेत सामील असलेल्या राज्यात काँग्रेसला विजय मिळू शकतो. काँग्रेसची छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात सत्ता आहे. यापैकी महाराष्ट्रात सहा जागा रिक्त होणार असून यामध्ये शरद पवार यांच्या जागेचा समावेश आहे.

प्रियंका गांधी जाणार राज्यसभेवर; छत्तीसगडमधून मिळणार उमेदवारी
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. अनेक नव्या चेहऱ्यांकडे नेतृत्व सोपविण्यात येणार असून त्यांना राज्यसभेवर पाठविण्याची योजना काँग्रेसने केल्याचे दिसून येते आहे. त्या अंतर्गत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना राज्यसभेत पाठविण्यावर काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे.
प्रियंका गांधी यांना छत्तीसगडमधून उमेदवारी देण्यात येऊ शकते. यावर्षी राज्यसभेत विरोधी पक्षांची ताकत कमी होणार आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षी 68 पदे रिक्त होत आहे. या जागा भरण्यासाठी काँग्रेसची ताकद कमी पडणार आहे. त्यामुळे पक्षाला काही जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही राज्यांत काँग्रेसची क्षमता कमी असल्यामुळे सभाग्रहात सामील होणाऱ्या 19 पैकी 9 जागा काँग्रेसला गमवाव्या लागू शकतात. काँग्रेसला स्वबळावर 9 जागा कायम राखण्याची खात्री आहे. तसेच आपल्या मित्रपक्षांच्या मदतीने आणखी काही जागा मिळविण्याची काँग्रेसला आशा आहे.
दरम्यान सत्तेत सामील असलेल्या राज्यात काँग्रेसला विजय मिळू शकतो. काँग्रेसची छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात सत्ता आहे. यापैकी महाराष्ट्रात सहा जागा रिक्त होणार असून यामध्ये शरद पवार यांच्या जागेचा समावेश आहे.