काँग्रेसचे उदयपूरमध्ये चिंतन शिबिर; देशभरातून ४०० हून अधिक प्रमुख नेते उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 06:47 AM2022-05-13T06:47:42+5:302022-05-13T06:48:24+5:30
चिंतन शिबिराच्या निमित्ताने स्वागतासाठी येथे पोस्टर लागले आहेत. या पोस्टरवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रसचे नेते राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे छायाचित्र आहे.
आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क
उदयपूर : राजस्थानात उदयपूर येथे शुक्रवारपासून काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबिर होत आहे. पक्षाचे ४०० हून अधिक नेते यात उपस्थित राहतील. ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा मुकाबला करण्यासाठी मार्ग शोधणे व आगामी निवडणुकांसाठी रणनीतीवर या वेळी चर्चा होईल. शिबिराची सुरुवात १३ मे रोजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या संबोधनाने होईल. त्यानंतर सहा वेगवेगळ्या समूहांत नेते चर्चा करतील. १५ मे रोजी राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करतील.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, मुक्त अर्थव्यवस्था, संपत्तीची वाढीत असमानता, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ आदी विषयांवर विचार केला जाईल. चीनकडून भारताच्या अखंडतेवर हल्ला होत आहे. दलित, एससी, एसटी, अल्पसंख्याकांच्या अधिकारांवर हल्ला होत आहे. दोन समुदायांना विभाजित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सुरजेवाला म्हणाले की, धर्मांधतेचा बुलडोझर, अंधश्रद्धा, धर्मांधता, अन्याय आणि असहिष्णुता हे देशावर लादले गेले आहेत. त्यामुळे देशाच्या विकासाला अडथळे येत आहेत. ते म्हणाले की, काँग्रेसने सहा विषयांची निवड केली आहे. त्यावर कार्यवाहीसाठी समूहांची नियुक्ती केली आहे. या समूहात राजकीय, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, अर्थव्यवस्था, पक्षाचे संघटन, शेतकरी आणि शेतमजूर आणि युवा यांचा समावेश आहे. चिंतन शिबिरासाठी येणाऱ्या ४३० लोकांना विविध समूहात विभाजित करण्यात येईल. या तीन दिवसांत विविध विषयांवर मंथन होईल. याचा निष्कर्ष काँग्रेस अध्यक्षांकडे मांडला जाईल. त्याला अंतिम स्वरुप आणि मंजुरी देण्यासाठी कार्यसमितीकडे पाठविण्यात येईल.
शहरात लागले पोस्टर
चिंतन शिबिराच्या निमित्ताने स्वागतासाठी येथे पोस्टर लागले आहेत. या पोस्टरवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रसचे नेते राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे छायाचित्र आहे. शहरात ठिकठिकाणी हे पोस्टर दिसत आहेत.