शिलाँग- मेघालयातल्या अंपाती जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मियानी डी शिरा यांनी विजय मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवार मोमिन यांचा 3191 मतांनी पराभव केला आहे. एकीकडे या विजयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. तर दुसरीकडे या पोटनिवडणुकीतील विजयामुळे मेघालयात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.मियानी डी शिरा या काँग्रेस पक्षाकडून अंपाती जागेवर पोटनिवडणूक लढवत होती. मियानीच्या आधी या जागेवर मेघालयाचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमांनी निवडणूक जिंकली होती. परंतु त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानं या जागेवर पोटनिवडणूक लागली होती. 28 मे रोजी या जागेवर मतदान घेण्यात आले असून, त्यावेळी जवळपास 90टक्क्यांहून अधिक लोकांनी मतदान केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आज जाहीर झालेल्या निकालावरून मियानी डी शिरानं स्वतःच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार मोमिनचा 3191 मतांनी पराभव केला होता. काँग्रेस बनला राज्य विधानसभेत सर्वात मोठा पक्षगुरुवारी या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस हा मेघालय राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 21 जागांवर विजय मिळाला होता. तर नॅशनल पीपल्स पार्टीनं 19 जागा जिंकल्या आहेत. त्या निवडणुकीत मुकुल संगमा दोन जागांवरून विजयी झाले होते. त्यामुळे त्यांनी एका जागेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसजवळ 20 जागा शिल्लक राहिल्या. पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मियानी डी शिरा विजयी झाल्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ पुन्हा 21 झालं आहे. नॅशनल पीपल्स पार्टीला विलियमनगर विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर त्याची संख्या 20 पर्यंत पोहोचली आहे.
मेघालयात काँग्रेस बनला नं. 1... सत्ताधारी पक्षालाही टाकलं मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 4:38 PM