सोनभद्रप्रकरणी काँग्रेस सदस्यांची संसदेच्या परिसरात निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 03:01 AM2019-07-23T03:01:22+5:302019-07-23T03:01:50+5:30
पीडितांना न्याय द्या : हातात फलक घेऊन घोषणाबाजी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात दहा आदिवासींची हत्या झाल्याच्या प्रकरणात न्याय देण्याची मागणी करीत आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना सोनभद्रकडे जाताना अडविल्याच्या निषेधार्थ काँग्रेस सदस्यांनी सोमवारी संसद भवन परिसरात निदर्शने केली.
सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांतील अनेक सदस्यांनी संसद भवन परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. या निदर्शनात लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीन रंजन चौधरी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व अन्य नेते सहभागी झाले होते.
काँग्रेसचे संसद सदस्य गौरव गोगोई यांनी आरोप केला की, उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने सोनभद्र घटनेतील पीडितांना न्याय देण्याऐवजी प्रियांका गांधी यांना अडविले. आमची अशी मागणी आहे की, पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा.
काय आहे प्रकरण?
प्रियांका गांधी शुक्रवारी सोनभद्रकडे निघाल्या असताना प्रशासनाने त्यांना रोखले होते. सोनभद्र सामूहिक हत्याकांडातील पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्या जात होत्या. दरम्यान, प्रशासनाच्या भूमिकेला विरोध करीत प्रियांका गांधी यांनी धरणे आंदोलन केले.
दुसऱ्या दिवशी पीडित कुटुंबियांमधील काही सदस्यांनी चुनार गेस्ट हाउस येथे जाऊन प्रियांका गांधी यांच्याशी संवाद साधला. जमिनीच्या वादातून सरपंचाने दुसºया गटातील लोकांवर गोळीबार केला होता.