"कृष्ण आहेत रेवण्णा...", प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 09:28 AM2024-05-03T09:28:02+5:302024-05-03T09:58:43+5:30
Karnataka Scandal : कर्नाटकातील एका मंत्र्याने एचडी देवेगौडा यांचा नातू आरोपी प्रज्वल रेवण्णा यांची तुलना भगवान श्रीकृष्णासोबत करून वाद निर्माण केला आहे.
नवी दिल्ली : राजकीय वर्तुळाला हादरवणाऱ्या कर्नाटकमधील प्रज्वल रेवण्णा सेक्स कांडमुळे सर्वत्र चर्चेला ऊत आला आहे. जनता दल (सेक्युलर) खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहेत. यासंबंधी अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली आहे. दरम्यान, कर्नाटकातील एका मंत्र्याने एचडी देवेगौडा यांचा नातू आरोपी प्रज्वल रेवण्णा यांची तुलना भगवान श्रीकृष्णासोबत करून वाद निर्माण केला आहे.
एका व्हायरल व्हिडिओमध्ये सिद्धरामय्या सरकारमधील उत्पादन शुल्क मंत्री रामाप्पा तिम्मापूर हे प्रज्वल रेवण्णाविषयी बोलताना दिसत आहेत. यामध्ये त्यांनी प्रज्वल रेवण्णा यांची तुलना भगवान कृष्णाशी केली आहे. व्हिडिओमध्ये रामाप्पा तिम्मापूर म्हणतात, "एमबी पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे हा पेनड्राइव्हचा मुद्दा आहे. देशात यापेक्षा वाईट काहीही घडले नाही. यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो. भगवान श्रीकृष्ण अनेक स्त्रियांसोबत भक्तिभावाने राहत होते. मला वाटते की, त्यांना तो विक्रम मोडायचा आहे."
मंत्री रामाप्पा तिम्मापूर यांनी विजयपुरा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात ही टिप्पणी केली. त्यांचे संपूर्ण भाषण कन्नडमध्ये आहे. दरम्यान, रामाप्पा तिम्मापूर यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकात खळबळ उडाली होती. हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर भाजपाने रामाप्पा तिम्मापूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, भाजपा नेते आणि कर्नाटकचे माजी मंत्री सीटी रवी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "कर्नाटक सरकारमधील काँग्रेस नेत्याने भगवान कृष्णाचा अपमान केला आहे. त्यांची तातडीने मंत्रिमंडळातून व पक्षातून हकालपट्टी करावी, अन्यथा आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन करू".
दरम्यान,भाजपाने निशाणा साधल्यानंतर काँग्रेसनेही रामाप्पा तिम्मापूर यांच्या वक्तव्याचे समर्थन केले नाही. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, "या वक्तव्याचा मी निषेध करते. या वक्तव्यापासून आम्ही लांब आहोत. ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. प्रज्वल रेवण्णा हे एक राक्षस आहेत". दुसरीकडे, महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या हासन मतदारसंघातील जेडी (एस) खासदार प्रज्वल रेवण्णा यांना अटक करण्यासाठी लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे, अशी माहिती कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वरा यांनी गुरुवारी दिली आहे.