बाडमेर (राजस्थान) : विविध योजनांचे केवळ भूमिपूजन करून काँग्रेसने जनतेची दिशाभूल केली व गरिबांच्या कल्याणासाठी काहीही केले नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेवर आली तेव्हा तेव्हा दुष्काळ पडला. काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवला की दुष्काळही बाहेर गेला, असे तेम्हणाले.बाडमेर जिल्ह्यात पाचपदरा येथील ४३,१२९ कोटी रुपयांच्या रिफायनरीच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर मोदी बोलत होते. ते म्हणाले की, केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी काँग्रेसने रेल्वेंची घोषणा केली; मात्र या योजना प्रत्यक्षात कधीच पुढे सरकल्या नाहीत. काँग्रेसने केवळ घोषणाबाजी केली. संरक्षण कर्मचाºयांसाठीच्या वन रँक वन पेन्शनचे श्रेय लाटण्यासाठी २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने ५०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले.बाडमेर रिफायनरी कमीत कमी कागदावर तरी आहे. ओआरओपी तर कागदांवरही नव्हते. लाभार्थींसाठी, तसेच यावरील खर्चासाठी कोणतेही काम करण्यात आले नाही.ओआरओपी लाभार्थींची यादी तयार करण्यासाठी दीड वर्ष लागले. योजनेसाठी १२,००० कोटी लागले असताना काँग्रेसने केवळ ५०० कोटींची तरतूद केली होती. यातील १०,७०० कोटी रुपये याआधीच चार हप्त्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित निधी लवकरच दिला जाईल, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)निवडणुकांवर डोळा : राज्यात अल्वर व अजमेर या दोन लोकसभा मतदारसंघांत व मंडलगढ या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २९ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वी आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राजस्थानमध्ये या वर्षअखेर विधानसभा निवडणुका होणार आहेत.
काँग्रेसने जनतेची दिशाभूल केली, राजस्थानातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 2:24 AM