नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता विरोधी पक्षांकडून मोदी सरकारला टार्गेट करण्यत येत आहे. केंद्र सरकार कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यात अयपशी ठरत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यात, प्रामुख्याने काँग्रेसकडून सातत्याने केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका होत आहे. तर, दुसरीकडे भारत आणि चीनच्या सीमारेषेवरील तणावावरुनही काँग्रेसने मोदींना लक्ष्य केले आहे. मात्र, काँग्रेसने केलेल्या एका चुकीवरुन भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस कार्य समितीची मंगळवारी बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर, या बैठकीतील काँग्रेस कार्य समितीचा तपशील काँग्रेसने पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर केला. मात्र, ट्विटरवर मेसेज लिहिणाऱ्याकडून चुकून काँग्रेस कार्य समितीऐवजी काँग्रेस कायरसमिती असा शब्द वापरण्यात आला. या ट्विटर हँडलवर 'काँग्रेस कार्यसमिती का बयान' ऐवजी 'काँग्रेस कायरसमिती का बयान' असा शब्दप्रयोग झाला. काँग्रेसच्या या गलती से मिस्टेकवरुन भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसच्या चुकीला संधी बनवून भाजपाने काँग्रेसवर टीका केली.
भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन काँग्रेसच्या या चुकीच्या ट्विटचा फोटो शेअर केला आहे. तसेच, कधी कधी असंही होतं, ज्यावेळी काँग्रेस पक्षही खरं बोलतो. कायर ही है ये लोग... असे भाजपाने म्हटले आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांना हा स्क्रीनशॉट आपल्या अकाऊंटवरुनही शेअर केला आहे. दरम्यान, गलवान खोऱ्यात चीनी सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली. सीमारेषेवरील या हल्ल्यात 20 भारतीय जवानांना वीरमरण पत्करावे लागले. त्यानंतर, काँग्रेसकडून केंद्र सरकारल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात येत आहे. काँग्रेस आणि भाजपा एकमेकांवर शाब्दीक हल्ले करताना दिसून येत आहेत.
काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीनंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी मोदींवर निशाणा साधला. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच लडाख सीमारेषेवर तणाव असल्याचं सोनिया गांधींनी म्हटलं आहे. तसेच, योग्य सल्ला भाजपा नेत्यांना पचनी पडत नसल्याचंही सोनिया यांनी म्हटलं.