One Nation One Election : मागील अनेक महिन्यांपासून ज्या विधेयकाची चर्चा सुरू होती, ते 'एक देश, एक निवडणूक' विधेयक आज(दि.17) अखेर लोकसभेत सादर करण्यात आले. पण, या विधेयकाला काँग्रेस, टीएमसी आणि सपासह अनेक पक्षांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान, या सर्व गदारोळात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची महत्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान बोलताना नड्डा म्हणाले की, मागील काँग्रेस सरकारांनी कलम 356 चा वारंवार गैरवापर केल्याचा इतिहास पाहता, मोदी सरकारने 'एक देश, एक निवडणूक' विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. कलम 356 राष्ट्रपती राजवटीशी संबंधित असून. दरम्यान, आपल्या भाषणादरम्यान नड्डांनी काँग्रेसवर राज्यघटनेची मूलभूत तत्वे बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
काँग्रेसने निवडून आलेली सरकारे पाडली
नड्डा पुढे म्हणाले की, आज तुम्ही एक देश, एक निवडणुकीच्या विरोधात उभे आहात. पण, तुमच्यामुळेच एक देश, एक निवडणूक आणायची आहे. कारण 1952 ते 1967, या काळात देशात एकाच वेळी निवडणुका झाल्या. कलम 356 चा वापर करून तुम्ही (काँग्रेस) वारंवार राज्यांतील निवडून आलेली सरकारे पाडलीत आणि अनेक राज्यांत स्वतंत्र निवडणुकांची परिस्थिती निर्माण केली.
इंदिराजींनी 50 वेळा तर मनमोहन यांनी 10 वेळा...कलम 356 चे आकडे सभागृहात मांडताना जेपी नड्डा म्हणाले की, काँग्रेस सरकारने 90 वेळा कलम 356 चा गैरवापर केला आहे. इंदिरा गांधींनी कलम 356 चा सर्वाधिक 50 वेळा वापर केला. तर, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356 चा आठ वेळा, राजीव गांधींनी नऊ वेळा आणि मनमोहन सिंग यांनी दहा वेळा गैरवापर केला आहे, अशी घणाघाती टीकाही नड्डांनी यावेळी केली.
मनमोहन, गुजराल, अडवाणींचा उल्लेख पश्चिम पाकिस्तानातून आलेले मनमोहन सिंग, इंदर कुमार गुजराल भारताचे पंतप्रधान झाले, पश्चिम पाकिस्तानातून आलेले लालकृष्ण अडवाणी भारताचे उपपंतप्रधान झाले. पण, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, पीओकेतून जम्मू-काश्मीरमध्ये आलेला एकही व्यक्ती जम्मू-काश्मीरच्या विधानसभेचा सदस्य होऊ शकत नव्हता, त्यांना पंचायत निवडणूक लढवता येत नव्हता, त्या व्यक्तीला मतदानही करण्याचा अधिकार नव्हता. नरेंद्र मोदींच्या सरकारने त्यात सुधारणा केली आणि आज जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आणीबाणीवरुन नड्डांची टीका
आणीबाणीचा उल्लेख करत नड्डा म्हणाले, देशावर काही संकट आले होते का, की देशावर आणीबाणी थोपवली गेली. नाही... देशाला कसलाही धोका नव्हता, खुर्चीला धोका होता. किस्सा खुर्चीचा होता. जिच्यासाठी संपूर्ण देशाला अंधकारात ढकलण्यात आले. काँग्रेसचे सदस्य म्हणतात की, त्यांच्या नेत्याने आणीबाणीची चूक मान्य केली आहे, त्यामुळे याचा वारंवार उल्लेख केला जाऊ नये. पण, आणीबाणीच्या काळात लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला. आपल्या मनात जर प्रायश्चित्ताची जराही भावना असेल, तर मी आवाहन करतो की, तुम्ही 25 जून 2025 रोजी लोकशाही विरोधी दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा.