पटना : देशात कोरोनाच्या दोन लसींना मंजुरी मिळाल्यानंतर आता यावरून राजकारण सुरू झाले आहे. एकीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ही लस घेण्यास नकार दिला. त्यांनी म्हटले आहे की, ही भाजपची लस आहे. दुसरीकडे, बिहारमधील काँग्रेसचे आमदार अजित शर्मा यांनीही लसींबाबत संभ्रम असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी ही कोरोनावरील लस घ्यावी, असे म्हटले आहे.
रशिया आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ज्या प्रकारे लसविषयी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आधी स्वतः लसचा डोस घेतला होता. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाची पहिली लस घ्यावी. जेणेकरून या लसीबद्दल जनतेचा आत्मविश्वास वाढेल, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित शर्मा यांनी म्हटले आहे. तसेच, पंतप्रधान मोदींसह भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनीही कोरोनाची लस आधी घ्यावी जेणेकरुन लोकांमध्ये या लसीबाबत आत्मविश्वास वाढेल, अशी मागणी अजित शर्मा यांनी केली आहे.
अजित शर्मा म्हणाले, "नवीन वर्षात दोन लसी आल्या आहेत, ही एक आनंददायी बाब आहे. परंतु याबद्दल लोकांमध्ये शंका आहे. ही शंका दूर करण्यासाठी रशिया आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ज्याप्रकारे पहिली लस घेऊन जनतेला विश्वासात घेतले आहे. तसेच माझे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वात वरिष्ठ भाजप नेत्याने पहिली लस घेऊन लोकांचा विश्वास जिंकला पाहिजे."
याचबरोबर, देशात कोरोनावर आलेल्या लसींचे श्रेय भाजपा घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप अजित शर्मा यांनी केला. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांनी कोरोना लस तयार केली आहे. त्या कंपन्या प्रत्यक्षात काँग्रेसच्या काळातच स्थापन करण्यात आल्या होत्या, असे अजित शर्मा म्हणाले. ते म्हणाले, "लसीनंतर भाजपा सर्वत्र थाळी वाजवत आहे आणि उत्सव साजरा करीत आहे, पण काँग्रेसलाही श्रेय मिळायला हवे कारण या दोन कंपन्या काँग्रेसच्या कार्यकाळात स्थापित झाल्या होत्या."
दिग्विजय सिंह यांच्या बंधूंनी दिला असा सल्लाकोरोना लसीवर उद्भवलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील चाचौडा येथील काँग्रेसचे आमदार आणि दिग्विजय सिंह यांचे बंधू लक्ष्मण सिंह यांनी पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्र्यांना आधी लस घेण्याचा सल्ला दिला आहे. याबद्दल त्यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "कोविड लसीबाबत अनेक गैरसमज आहेत. पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्री, मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आधी लस घ्यावी. सर्व काही ठीक झाले तर जनता सुद्धा लस घेईल."
तिसऱ्या टप्प्यातील चाचणीशिवाय परवानगी कशी दिली? कोवॅक्सिन लसीसंदर्भात शशी थरूरांचा सवालड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. मात्र, काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी डीसीजीआयने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला परवानगी देण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, "भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप झालेली नाही. कोवॅक्सिनला अपत्कालीन मंजुरी देणे धोकादायक ठरू शकते. डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. कोरोना लसीचे ट्रायल पूर्ण होईपर्यंत याचा वापर करणे टाळले पाहिजे. भारतात सध्या अॅस्ट्रॅजेनेका लस वापरली पाहिजे."