गुजरात पलायन: अल्पेश ठाकोर स्वत:च्याच जाळ्यात, काँग्रेसनेही वर केले हात!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 02:26 PM2018-10-09T14:26:42+5:302018-10-09T14:29:07+5:30
द्वेष पसरवणारी भाषा वापरत असलेला अल्पेश ठाकोरांचा व्हिडीओ व्हायरल
अहमदाबाद: उत्तर भारतीयांविरोधात द्वेष पसरवण्याचा आरोप झाल्यानंतर आता काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. मी जर एखाद्याला धमकी दिली असेल, तर मी स्वत: तुरुंगात जाईन, असं ठाकोर यांनी म्हटलं आहे. याशिवाय आपण 11 ऑक्टोबरपासून उपोषण करणार असल्याचंदेखील त्यांनी जाहीर केलं आहे. सध्या अल्पेश ठाकोर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. यामध्ये ठाकोर यांनी द्वेष पसरवणारी भाषा वापरली आहे. त्यामुळे ते सध्या वादात सापडले आहेत.
एका अल्पवयीन मुलीवर उत्तर भारतीय व्यक्तीनं बलात्कार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये घडली. यानंतर स्थानिकांकडून उत्तर भारतीय लोकांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे शेकडो उत्तर भारतीयांनी गुजरात सोडलं आहे. यावरुन आता अल्पेश ठाकोर वादात सापडले आहेत. उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांमागे अल्पेश ठाकोर आणि त्यांची ठाकोर सेना असल्याचा आरोप होत आहे. याबद्दलचा ठाकोर यांचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. यानंतर आता ठाकोर यांनी सारवासारव सुरू केली आहे.
गुजरातमध्ये घडणाऱ्या घटनांना राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप अल्पेश ठाकूर यांनी केला आहे. लोकांना सुरक्षा पुरवण्यात सरकारला अपयश आलं आहे. त्यामुळेच आता मला बदनाम केलं जात आहे, असा आरोप ठाकोर यांनी केला आहे. 'जर याप्रकारचं राजकारण होत असेल, तर मी राजीनामा देईन,' अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यावेळी मुलाच्या आजारपणाचा उल्लेख करत ते भावूकदेखील झाले. गुजरातमध्ये फक्त एका भागात हिंसाचार झाला आहे आणि त्याचा मी निषेध करतो, असं ते म्हणाले.
विशेष म्हणजे अल्पेश ठाकोर अडचणीत सापडल्यावर काँग्रेसनंदेखील हात वर केले आहेत. ठाकोर दोषी असतील, तर त्यांना अटक करण्यात यावी, अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे. अल्पेश यांचे मित्र समजले जाणारे पाटीदार नेते हार्दिक पटेल आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनीदेखील सावध भूमिका घेतली आहे. जर हिंसाचारमागे अल्पेश ठाकोरांचा हात असेल, तर त्यांना अटक केली जावी, अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी घेतली आहे.