सेल्फी काढणा-या विद्यार्थ्यावर संतापले काँग्रेस आमदार, मोबाइलच टाकला फोडून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 11:22 AM2017-11-21T11:22:48+5:302017-11-21T11:24:26+5:30
पत्रकारांशी बोलत असताना मागे उभा राहून सेल्फी काढणा-या विद्यार्थ्यांवर कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी के शिवकुमार चांगलेच संतापले. त्यांचा राग इतका अनावर झाला की, त्यांनी विद्यार्थ्याच्या हातावर फटका मारुन त्याचा मोबाइलच खाली पाडला.
नवी दिल्ली - पत्रकारांशी बोलत असताना मागे उभा राहून सेल्फी काढणा-या विद्यार्थ्यांवर कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी के शिवकुमार चांगलेच संतापले. त्यांचा राग इतका अनावर झाला की, त्यांनी विद्यार्थ्याच्या हातावर फटका मारुन त्याचा मोबाइलच खाली पाडला. बेळगावमधील एका कॉलेजमध्ये बालहक्काशी संबंधित एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा सर्व प्रकार कॅमे-यात कैद झाला. उपस्थित पत्रकारांनी विचारलं असता ही काही इतकी मोठी गोष्ट नसल्याचं त्यांनी सांगितलं.
कनकपूरा मतदारसंघातून आमदार असलेले काँग्रेसचे शिवकुमार पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांच्या मागे एक विद्यार्थी आपल्या मोबाइल फोनवरुन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. अचानक शिवकुमार याचं लक्ष मागे गेलं आणि त्यांचा पारा चढला. त्यांनी विद्यार्थ्याच्या हातावर जोरदार फटका मारला, ज्यामुळे विद्यार्थ्याच्या हातातून मोबाइल खाली पडला. आपला फुटलेला मोबाइल घेण्यासाठी विद्यार्थी तसाच निघून गेला. आपल्या मोबाइलचे पार्ट्स विद्यार्थी गोळा करत असताना शिवकुमार यांनी मात्र काहीच झालं नसल्याप्रमाणे पुन्हा एकदा पत्रकारांशी बोलणं सुरु ठेवलं.
#WATCH Karnataka Min DK Shivkumar hits a man who was taking a selfie during a child rights event at a college in Belgaum (Mobile Video) pic.twitter.com/Sc2jMyK08a
— ANI (@ANI) November 20, 2017
शिवकुमार बोलत असल्याने प्रसारमाध्यमांचे कॅमेरे सुरु होते, त्यामुळे हा सगळा प्रकार रेकॉर्ड झाला. काही वेळातच घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शिवकुमार यांच्या वर्तवणुकीवर टीका झाली. पण माफी मागायचं सोडा त्यांनी साधा खेदही व्यक्त केला नाही.
'एवढी साधी गोष्ट कळली पाहिजे. जेव्हा मी माझी जबाबदारी पार पडत आहे आणि पत्रकारांशी बोलतोय तेव्हा कसं काय कोणी सेल्फी काढू शकतो ? ही अत्यंत छोटी घटना होती', असं शिवकुमार बोलले आहेत.
Have basic common sense. When I'm doing my responsibility & addressing the press how can someone come out for a selfie? It was a normal incident: Karnataka Minister DK Shivakumar on hitting a man who was trying to take a selfie pic.twitter.com/lbPzFCe5js
— ANI (@ANI) November 20, 2017
शिवकुमार वादात सापडण्याची ही काही पहिलीच घटना नाही. ऑगस्ट महिन्यात आयकर विभागाने त्यांच्या घरावर आणि बंगळुरुमधील संपत्तीवर धाड टाकली होती. करचुकवेगिरी केल्याप्रकरणी त्यांनी आयकर विभागाने हजर होण्यासाठी नोटीसही पाठवली होती. त्यावेळीही शिवकुमार यांनी आपण काहीच चुकीचं केलं नसल्याचा दावा केला होता. राजकीय शत्रुत्वातून ही छापेमारी करण्यात आली असून, यामागे भाजपा असल्याचा दावा त्यांनी केला होता.