Chirag Patel Resigned Congress MLA in Gujarat, BJP : 2024 च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्येकाँग्रेस शरण येईल का? काँग्रेस पक्ष आपल्या १६ आमदारांना वाचवू शकणार नाही का? काँग्रेस पक्षाचे खरेच विघटन होईल आणि भाजप तिसऱ्यांदा राज्यात 'क्लीन स्वीप' करेल का? अशा विविध चर्चांना सध्या गुजरातमध्ये जोर आला आहे. काँग्रेस पक्षाचे खंभातमधून विजयी होऊन आमदार झालेले चिराग पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर आता घोडाबाजार तेजीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लागेपर्यंत काँग्रेस गुजरातमध्ये 'शून्यावर' पोहोचेल की काय, असे बोलले जात आहे.
गुजरात विधानसभेच्या दोन आमदारांनी (काँग्रेसचे १ आणि आपचे १) सात दिवसांत दिलेले राजीनामे 'ऑपरेशन लोटस'शी जोडले जात आहेत. या वेळी पक्षाला पाच लाखांच्या फरकाने सर्व जागा जिंकता याव्यात यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व 26 जागांवर विजय निश्चित करायचा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पदाचा राजीनामा दिल्यानंतर चिराग पटेल यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. पटेल म्हणाले की, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी शिगेला पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत आणखी आमदारही राजीनामे देणार आहेत. पक्षाच्या आमदारांमध्ये फक्त अमित चावडा हेच उरणार असल्याचे चिराग पटेल यांनी उपहासात्मकपणे सांगितले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस शून्यावर पोहोचेल, अशा प्रकारची चर्चा राज्याच्या राजकारणात जोर धरू लागली आहे.
विरोधकांचा 'करेक्ट कार्यक्रम'?
आधी आप मग काँग्रेसमधील फुटीमुळे गुजरातमधील दोन्ही विरोधी पक्ष बॅकफूटवर आले आहेत. काँग्रेस आमदाराच्या राजीनाम्यानंतर आम आदमी पक्षाचे आमदार पुन्हा कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांनी पक्ष सोडत नसल्याचा पुनरुच्चार केला. पण आमदाराच्या राजीनाम्याने लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षात तीव्र दुफळी असल्याचा आरोप आमदाराने केला आहे. अशा स्थितीत पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी गुजरात आघाडीवर राज्यसभेच्या दोन खासदारांची नियुक्ती करूनही आमदार पक्षातून बाहेर पडण्याचे प्रकार थांबत नाहीत, हा मोठा प्रश्न आहे. अशा स्थितीत पक्ष स्वत:ची ताकद आणि जनतेचा विश्वास कसा मजबूत करणार? असा सवाल विरोधकांपुढे आहे. आम आदमी पक्षाचीही तीच अवस्था आहे. पक्षाने एक आमदार गमावला आहे, तर विधिमंडळ पक्षनेते चैत्र वसावा तुरुंगात आहेत. अशा स्थितीत पक्षाने राज्यातील स्वतःचा कारभार कसा सांभाळावा, या विवंचनेत आप असल्याचे दिसत आहे.