टी-शर्ट घालून विधानसभेत पोहोचले काँग्रेसचे आमदार, विधानसभाध्यक्षांनी काढले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 02:46 AM2021-03-16T02:46:48+5:302021-03-16T06:57:21+5:30
सोमनाथ मतदारसंघातील विमल चुडासामा गेल्या आठवड्यात टी-शर्ट घालून आले, तेव्हाच अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी आक्षेप घेतला होता. यापुढे टी-शर्ट घालून सभागृहात न येण्याचे आवाहन केले होते. तरीही चुडासामा आज टी-शर्ट घालून आले.
गांधीनगर : विधानसभेत टी-शर्ट घालून आलेले काँग्रेसचेआमदार विमल चुडासामा यांना सोमवारी विधानसभाध्यक्षांनी सभागृहातून बाहेर काढले. सभागृहात असे कपडे घालून येणे अयोग्य आहे, असे अध्यक्षांचे म्हणणे आहे. मात्र पेहरावाबाबत कोणताही नियम नसल्याने आमदारास सभागृहातून बाहेर काढणे चुकीचे होते, असे काँग्रेस आमदारांनी बोलून दाखविले. (Congress MLA expelled for wearing T-shirt in Assembly)
सोमनाथ मतदारसंघातील विमल चुडासामा गेल्या आठवड्यात टी-शर्ट घालून आले, तेव्हाच अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी आक्षेप घेतला होता. यापुढे टी-शर्ट घालून सभागृहात न येण्याचे आवाहन केले होते. तरीही चुडासामा आज टी-शर्ट घालून आले. त्यांना कपडे बदलून या, असे अध्यक्षांनी सांगताच, या कपड्यात वाईट काय आहे, निवडणूक प्रचारही आपण टी-शर्ट घालूनच केला होता, असे ते म्हणाले. कोणता पोशाख घालावा वा घालू नये, याचे काहीही नियम नाहीत, असेही त्यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र अध्यक्षांनी वाटेल ते कपडे घालायला हे खेळाचे मैदान नाही, असे सुनावून, त्यांना सभागृहातून बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या. तीन ते चार मार्शल लगेच सभागृहात आले आणि त्यांनी चुडासामा यांना बाहेर नेले.
त्यानंतर अध्यक्षांशी वादावादी केल्याबद्दल चुडासामा यांचे सदस्यत्व रद्द करावे, असा प्रस्ताव विधान कार्यमंत्र्यांनी मांंडला. मात्र मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी हस्तक्षेप करून, अशा प्रस्तावाची गरज नाही, काँग्रेस आमदारांनी चुडासामा यांची समजूत घालावी, असे सांगून विषय तिथेच मिटवला.
कर्मचाऱ्यांना आहे नियम
महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांनी काय कपडे घालावेत, याबाबत काहीही नियम नाहीत. साधारणपणे हे आमदार टी शर्ट घालतही नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र कार्यालयात टी शर्ट व जीन्स घालून जाण्यास बंदी आहे. ईशान्येकडील अनेक ज्यांतील आमदार मात्र सभागृहांत टी शर्ट व जीन्स घालून गेल्याची उदाहरणे आहेत.