भोपाळ : अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी देशभरात देणग्या गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केल्यानंतर यावर्षीच्या जानेवारी महिन्यापासून विश्व हिंदू परिषदेने देशव्यापी देणग्या गोळा करण्याची मोहीम हाती घेतली. मात्र, राम मंदिराच्या देणग्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. यावरून काँग्रेस नेत्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
झाबुआ मतदारसंघातून आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भूरिया यांनी राम मंदिराच्या देणग्याबाबत टीका केली आहे. भाजप नेते राम मंदिराच्या नावाखाली गेली अनेक वर्षे हजार कोटी रुपये जमा केले, त्याचे काय झाले, अशी विचारणा करत राम मंदिराच्या नावाखाली देणग्या गोळा करतात आणि त्याच पैशाचा वापर करून रात्री मद्यपान करतात, असा गंभीर आरोप भूरिया यांनी केला आहे.
पेट्रोलच्या किंमतीवरून 'राम-रावण'!; 'या' ज्येष्ठ खासदाराकडून मोदींना घरचा आहेर!
कांतिलाल भूरिया हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, त्यांनी केंद्रात दोन वेळा मंत्रिपद भूषवले आहे. पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले भूरिया आताच्या घडीला मध्य प्रदेशातील झाबुआ मतदारसंघाचे आमदार आहेत.
भाजपचा पलटवार
काँग्रेसच्या आरोपावर भाजपने पलटवार केला आहे. भाजप अनुसूचित जाती-जमातीचे प्रदेशाध्यक्ष कलसिंह भाबर यांनी सांगितले की, राम मंदिराचे काम सुरू झाल्याचे काँग्रेसला पाहावत नाहीये. काँग्रेसवाले आता काहीही बरळायला लागले आहेत. भूरिया यांनी त्यांच्या विधानाबाबत माफी मागावी, अशी मागणी भाबर यांनी केली आहे.
देणग्या थेट बँक खात्यात जमा
राम मंदिरासाठी जमा केल्या जाणाऱ्या देणग्या थेट बँक खात्यात भरल्या जातात. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र यांचे बँक खाते आहे, तेथेच हा सर्व निधी जमा केला जातो, अशी माहिती मध्य प्रदेशचे प्रोटेम स्पीकर रामेश्वर शर्मा यांनी दिली.