"मुलं थोडी प्यायली तर…"; दारू प्यायलेल्या नातेवाईकावर कारवाई केल्याने काँग्रेस आमदाराचं आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 05:07 PM2021-10-19T17:07:16+5:302021-10-19T17:08:58+5:30
Congress MLA Meena Kanwar : काँग्रेसच्या महिला आमदार मीना कंवर पोलीस ठाण्यामध्ये धरणे आंदोलन करताना दिसत आहे.
नवी दिल्ली - सोशल मीडियावर अनेक व्हि़डीओ हे जोरदार व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून त्यामध्ये काँग्रेसच्या महिला खासदाराचा समावेश आहे. राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील शेरगड विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या महिला आमदार मीना कंवर पोलीस ठाण्यामध्ये धरणे आंदोलन करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मीना यांच्या एका नातेवाईकावर वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी कारवाई केली. मात्र या कारवाईमुळे मीना नाराज झाल्या आहेत. त्यांनी रातानाडा पोलीस स्थानकामध्ये धरणे आंदोलन करत या कारवाईला विरोध केला आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मीना यांचे पती उम्मेद सिंह चंपावत देखील त्यांच्यासोबत पोलीस स्थानकामध्ये बसून पोलीस कारवाईचा निषेध करताना दिसत आहेत. पोलिसांनी जेव्हा मीना यांचा नातेवाईकांपैकी एक असणाऱ्या तरुणाला तपासासाठी रस्त्यात थांबवलं असता तो आपले राजकीय वजन किती आहे हे सांगू लागला. हा तरुण पोलिसांनाच परिणामांबद्दल सांगू लागल्यानंतर पोलिसांनी त्याला दंडाची पावती फाडण्यास सांगितलं. त्यानंतर याबाबत माहिती मिळताच मीना कंवर थेट पोलीस स्थानकात आल्या आणि केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जमिनीवर बसून राहिल्या.
जनसेवा हो तो ऐसी!! गजब है!! सबके बच्चे लेते है. थोड़ी बहुत शराब पी ली तो क्या दिक्कत है. बेचारे शराबी रिश्तेदार के चालान से नाराज विधायक जी थाने में बैठ गई। मैडम राजस्थान कांग्रेस की MLA हैं। @ashokgehlot51#druck#MLAMeena@nitin_gadkaripic.twitter.com/FvFBU3bNEy
— lokesh singh (@reporterlokesh) October 18, 2021
काँग्रेसच्या आमदार मीना कंवर या नातेवाईक असलेल्या तरुणाने चुकी केल्याचं मान्य करण्यास तयार नव्हत्या. सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आमदार मीना या दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या त्या तरुणाची बाजू मांडताना दिसत आहेत. "सर्वांचीच मुलं पितात. यात काही विशेष नाही. मी तुम्हाला त्याला सोडण्याची विनंती केली होती. मुलं आहेत काय फरक पडतो जर त्यांनी थोडीफार दारू प्यायली तर?" असा प्रश्न आमदारांनी विचारला आहे.
पोलीस स्थानकामध्येच या महिला आमदाराचे पती आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला. पोलीस स्थानकामध्ये येण्याआधी मीना यांच्या पतीने फोन करुन पोलिसांना धमकावल्याचंही सांगण्यात येत आहे. असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये डीसीपींनी लक्ष घातल्यानंतर प्रकरण शांत झालं आणि मीना कंवर पोलीस स्थानकामधून आपल्या नातेवाईक तरुणाला घेऊन घरी गेल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.