भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये पोटनिवडणुकांपूर्वीच भाजपाकडूनकाँग्रेसला धक्का देण्यात आला आहे. काँग्रेसआमदार प्रद्युम्नसिंह लोधी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर, आता आपल्या लहान भावलाही भाजपात घेतले आहे. दमोह विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल लोधी यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
प्रद्युम्न लोधी यांच्या प्रवेशानंतर राहुल लोधी हेही भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र, त्यावेळी राहुल यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, आज राहुल यांनी आपल्या आमदारीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला, त्यानंतर जाहीरपणे भाजपात प्रवेश केला.
सन 2003 साली तत्कालीन मुख्यमंत्री दिग्विजय सिंह दमोह येथे आले होते. त्यावेळी राहुल लोधी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते आजतायगायत ते काँग्रेसचा हाथ धरुन चालत होते. भाजपाच्या गडाला हादरा देत लोधी यांनी काँग्रेसची ताकद वाढवून पक्षाचा आमदार या मतदारसंघात निवडून आणला. काँग्रेसनेच मला आमदार केलंय. त्यामुळे, मी काँग्रेस सोडणार नाही, असेही लोधींनी जाहीरपणे म्हटले होते. मात्र, पोटनिवडणुकीच्या अगोदरच त्यांनी संधी साधून भाजपात प्रवेश केला.