गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा ग्राऊंड लेव्हलला जाऊन तिकीट वाटपाचा सर्व्हे करत आहे. विद्यमान आमदारांना तिकीट द्यायचे की दुसऱ्या नेत्याला संधी द्यायची यावर प्रत्येक मतदारसंघाचा अहवाल तयार केला जाणार आहे. यासाठी तीन दिवसांसाठी निरीक्षकांना गुजरातच्या मतदारसंघांत पाठविण्यात आले आहे. जो चांगला उमेदवार असेल त्यालाच संधी दिली जाणार आहे. असे असताना एका मतदारसंघाने भाजपाला घाम फोडला आहे.
अरवल्ली जिल्ह्यातील मोडासा विधानसभा मतदारसंघात भाजपा नेत्यासमोर पेच निर्माण होणार आहे. सध्या या जागेवर काँग्रेसचा आमदार आहे. २००७ मध्ये ही जागा भाजपाकडे होती, परंतू २०१२ आणि २०१७ मध्ये याठिकाणी काँग्रेसचे आमदार निवडून येत आहेत. सध्या या ठिकाणी नेता राजेंद्र सिंह ठाकोर आमदार आहेत. या जागेवर लढण्यासाठी भाजपाच्या ३५ जणांनी दावा ठोकला आहे.
अहमदाबादच्या घाटलोडिया सीटवर तर एकानेच दावा केला आहे. मोडासा येथे पोहोचलेल्या निरीक्षकांना तब्बल आठ तास या नेत्यांशी बोलण्यात घालवावे लागले. इतर विधानसभा मतदारसंघातील नेतेही या जागेवरून लढू इच्छित आहेत. यामध्ये गेल्या वेळच्या पराभूत उमेदवारापासून ते जिल्हा प्रमुख, जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे.
एवढी रीघ कशासाठी?गेल्या वेळच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार केवळ 1640 मतांनी निवडून आला होता. यामुळे यावेळेला आप असल्याने मतांचे विभाजन होऊन भाजपचाच उमेदवार निवडणूक येण्याचे १०० टक्के चान्सेस आहेत. यामुळे इथे इच्छुकांची रांग लागली आहे.
घाटलोडिया मतदारसंघातून भूपेंद्र पटेल यांच्याशिवाय कोणीही उमेदवारीसाठी दावा केलेला नाही. पटेल यांनी 2017 च्या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. एकूण मतांच्या 72 टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. आम आदमी पक्षाने विजय पटेल यांना उमेदवारी दिली आहे.