काँग्रेस आमदार झुबेर खान यांचं निधन, दीड वर्षांपूर्वी झालं होतं लिव्हर ट्रान्सप्लान्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 09:52 AM2024-09-14T09:52:31+5:302024-09-14T09:53:08+5:30
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रामगडचे आमदार झुबेर खान यांचं आज निधन झालं. झुबेर खान हे बऱ्याच काळापासून आजारी होते. डॉक्टरांनी ...
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रामगडचे आमदार झुबेर खान यांचं आज निधन झालं. झुबेर खान हे बऱ्याच काळापासून आजारी होते. डॉक्टरांनी १५ दिवसांपूर्वीच त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, खान यांनी आज पहाटे ५.५० वाजता अखेरचा श्वास घेतला. झुबेर खान यांच्या पत्नी साफिया खान यांनी फेसबूकवरून त्यांच्या निधनाची माहिती दिली. दरम्यान, झुबेर खान यांच्या निधनाबद्दल माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी श्रद्धांजली दिली आहे.
झुबेर खान हे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. तत्पूर्वी १९९०, १९९३ आणि २००३ मध्येही आमदार म्हणून निवडून आले होते. ते काँग्रेसचे सचिव म्हणून काम पाहत होते. झुबेर खान यांची गणना राज्यातील मुस्लिम समाजाच्या बड्या नेत्यांमध्ये होत असे.
६१ वर्षीय झुबेर खान यांची दीर्घ राजकीय कारकीर्द राहिली आहे. त्यांची पत्नी साफिया खान यासुद्धा अशोक गहलोत यांच्या सरकारच्या काळात रामगड येथून आमदार राहिल्या होत्या. झुबेर खान यांच्यावर दीड वर्षांपूर्वी लिव्हर ट्रान्सप्लान्टची शस्रक्रिया झाली होती. तेव्हापासूनच त्यांची प्रकृती नाजूक बनलेली होती.