कुमारस्वामी सरकारवर काँग्रेसचेच आमदार नाराज; तक्रारींचा पाढा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 04:45 AM2018-09-27T04:45:56+5:302018-09-27T04:46:22+5:30
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका व विधान परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात रणनीती ठरविण्यासाठी कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या मंगळवारी आयोजिलेल्या बैठकीत पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधातील तक्रारींचा पाढाच वाचला.
बंगळुरू - पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका व विधान परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात रणनीती ठरविण्यासाठी कर्नाटककाँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या मंगळवारी आयोजिलेल्या बैठकीत पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधातील तक्रारींचा पाढाच वाचला.
प्रकल्पांना मंजुरी मिळत नाही. त्यामुळे विकासकामे खोळंबली आहेत, असे गाºहाणे नाराज काँग्रेस आमदारांनी पक्षनेत्यांच्या कानावर घातले. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही बैठक बोलावली होती. कर्नाटकात जनता दल (एस) व काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेत आहे तरीही राज्य सरकारकडून काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना योग्य वागणूक दिली जात नाही. यशवंतपूरचे आमदार एस.टी. सोमशेखर म्हणाले, काही खाण प्रकल्पांचे प्रस्ताव सरकारने फेटाळले; पण जनता दल (एस)च्या नेत्यांना अशा प्रकल्पांचे कंत्राट मात्र विनासायास मिळाले. सोमशेखर यांच्यासारखेच मत काँग्रेसच्या इतर आमदारांनीही व्यक्त केले. (वृत्तसंस्था)
समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन
काँग्रेस आमदारांची असलेली नाराजी राज्य सरकारच्या कानावर घालून या समस्येवर तोडगा काढू, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व विद्यमान उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी पक्षाच्या आमदारांना दिले आहे.