देशात मोदी सरकार सत्तेवर असतानाही भाजपाच्या ताब्यातून काँग्रेसकडे आलेल्या राज्यांमध्ये सध्या पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपाच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटक, मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार पाडण्याचा दावा केलेला असताना यामध्ये आणखी एका राज्याची भर पडली आहे. या राज्यात बसप आणि काँग्रेसचे 20-25 आमदार नाराज असल्याचा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीआधीच कर्नाटकमध्ये भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी जेडीएस-काँग्रेसचे कुमारस्वामी सरकार पडणार अशी वक्तव्ये केली होती. यानंतरही त्यांनी आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना यश आले नव्हते. लोकसभेनंतरही ते प्रयत्नशील आहेत. तसेच मध्यप्रदेशमध्येही काँग्रेस काठावर सत्तेत असल्याने तेथेही लोकसभा निकालानंतर भाजपकडून काँग्रेसची सत्ता हिसकावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बहुमत सिद्ध करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या राज्यांच्या यादीत आता राजस्थानचाही नंबर लागला आहे.
भाजपाचे राजस्थानचे उपाध्यक्ष ज्ञानदेव आहुजा यांनी आज सूचक वक्तव्य केले आहे. मी पक्षाचा प्रवक्ता नाही, पण बसपाचे आणि काँग्रेसचे 20 ते 25 आमदार नाखूश असल्याचे ऐकायला मिळत आहे. यावर जास्त बोलणार नाही, असे म्हटले आहे.
तर भाजपाचे आणखी एक नेते भवानीसिंग राजावत यांनीही काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी आम्हाला मेहनत घ्यायची गरज नाहीय. कारण काँग्रेस स्वत:च करत आहे. लवकरच काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु होईल आणि सत्ताधारी अल्पमतात जातील, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे पदही धोक्यात
गेल्या वर्षी राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवून पुनरागमन करणाऱ्या काँग्रेसलाराजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीत खातं उघडण्यात देखील यश आले नाही. या पराभवाचे खापर आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर फोडण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नाराज असून त्यामुळे गहलोत यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. गहलोत यांचे चिरंजीव वैभव जोधपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री गहलोत यांनी देखील आपल्या १३० सभांपैकी ९३ सभा मुलासाठी घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राहुल गांधी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.