भोपाळ - मध्य प्रदेशमधील डिंडोरी येथे राज्यपालांच्या कार्यक्रमादरम्यान एक अजब घटना घडली आहे. येथे राज्यपालांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमात जनतेला संबोधित करण्याची परवानगी न मिळाल्याने काँग्रेसच्याआमदारांनी परवानगीविना बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी माईक आणि स्पीकर बंद केला. (Congress MLAs started speaking without permission before the governor, officials turned off the mic)
मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांच्या उपस्थितीत डिंडोरी जिल्ह्यात एका कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. या कार्यक्रमाला भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार सम्पतिया उईके आणि स्थानिक काँग्रेसआमदार ओमकार सिंह मरकाम हे उपस्थित होते. मात्र राज्यपालांसमोर ओमकार सिंह यांनी जनतेला संबोधित करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे आमदार महोदय संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी परवानगीविनाच भाषण देण्यास सुरुवात केली.
राज्यपालांच्या संबोधनानंतर आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप होत होता. तेवढ्यात काँग्रेसचे आमदार मरकाम हे उभे राहिले. त्यांनी त्यांच्या बाजूला असलेल्या माईकवरून जनतेला संबोधित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी माईक आणि स्पीकर बंद केला. त्यामुळे मरकाम संतप्त झाले. जर राज्यसभा खासदारांना कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळत असेल तर त्यांना बोलण्याची संधी का दिली जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मग त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. यादरम्यान, प्रशासकीय अधिकारी आमदारांची समजूत काढताना दिसत होते.
राज्यपाल मंगूभाई पटेल हे त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान, मंगळवारी बैगाचक क्षेत्रातील ग्राम चाडा येथे पोहोचले होते. तेथे प्रशासनाने सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना लाभान्वित करण्यासाठी राज्यपालांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यादरम्यान, पंचायत भवन चाडा परिसरामध्ये झालेल्या कार्यक्रमात राज्यसभा सदस्य असलेले भाजपा नेते सम्पतिया उईके यांच्या संबोधनानंतर राज्यपालांनी सभेला संबोधित केले. मात्र आपल्याला बोलण्याची संधी न मिळाल्यामे काँग्रेस आमदार नाराज झाले. वाद वाढत असल्याचे पाहून पोलीस अधीक्षक संजय सिंह यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मरकाम यांची समजूत घातली आणि त्यांना शांत केले. वाद निवळल्यानंतर त्यांनी राज्यपालांसोबत मिळून लाभार्थ्यांसोबत फोटो काढले.