नवी दिल्ली- कर्नाटकात भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानं काँग्रेससह जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षानं सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. तसेच भाजपाविरोधात काँग्रेस आणि जेडीएसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यामुळे कर्नाटकातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस आणि जेडीएसच्या याचिकेवर तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. या पीठात न्यायाधीश ए. के. सिकरी, न्यायाधीश अशोक भूषण आणि न्यायाधीश शरद बोबडे यांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 112 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. 78 जागांवर विजयी झालेल्या काँग्रेसनं काल 38 उमेदवार निवडून आलेल्या जेडीएसला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेस- जेडीएस आघाडीकडे सध्या 116 आमदारांचं पाठबळ आहे. त्यामुळे आम्हाला संधी मिळावी, अशी मागणी काँग्रेस- जेडीएसनं केली आहे.LIVE अपडेट्स
येडियुरप्पांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, परंतु न्यायालयानं भाजपाला बजावली नोटीस