काँग्रेसने आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलविले; भाजपाकडून फोडाफोडी करण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 13:00 IST2022-06-02T12:59:50+5:302022-06-02T13:00:01+5:30
राजस्थान, हरयाणात भाजप फोडाफोडी करण्याची शक्यतेने काँग्रेसकडून जोरात तयारी

काँग्रेसने आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलविले; भाजपाकडून फोडाफोडी करण्याची भीती
-आदेश रावल
नवी दिल्ली : भाजपकडून काँग्रेस आमदार फोडले जाण्याच्या धास्तीने हरयाणा आणि राजस्थानच्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून सुरक्षित ठिकाणाची शोधाशोध केली जात आहे. हरयाणाच्या आमदारांना राजस्थान किंवा छत्तीसगडला हलविण्याचा विचार आहे. दुसरीकडे, राजस्थानच्या आमदारांची उदयपूरमधील काही हॉटेलांत ठेवण्यात आले आहे.
हरयाणातून कार्तिकेय शर्मा आणि राजस्थानमधून सुभाष चंद्रा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या दोन्ही राज्यांत निवडणूक होत आहे. १० जूनला मतदान होणार आहे. तोपर्यंत या आमदारांना भाजपपासून सुरक्षित ठेवले जाईल.हरयाणात काँग्रेसचे ३१ आमदार आहेत; त्यापैकी कुलदीप बिष्णोई हे नाराज आहेत.
चंडीगडमध्ये अजय माकन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदारांना कुठे ठेवयाचे, यावर चर्चा झाली. चर्चेअंती सर्व आमदारांना राजस्थानला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण सुभाष चंंद्रा यांनी उमेदवारी दाखल केल्याने तेथेही निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री गेहलोत हे राज्यसभा निवडणुकीत व्यस्त असतील; तेव्हा हरयाणाच्या आमदारांंना छत्तीसगडला नेले जाऊ शकते. छत्तीसगड सरकारने मात्र एवढ्या आमदारांसाठी चांगले रिसॉर्ट उपलब्ध करून देण्याबाबत असमर्थता व्यक्त केली.