काँग्रेसचा पत्ता बदलतोय; आज नव्या मुख्यालयात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 08:04 IST2025-01-15T08:03:44+5:302025-01-15T08:04:47+5:30
अलविदा २४, अकबर रोड... वेलकम ९ ए, कोटला मार्ग

काँग्रेसचा पत्ता बदलतोय; आज नव्या मुख्यालयात प्रवेश
- आदेश रावल
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचा नवीन पत्ता आता बुधवारपासून ९ ए, कोटला मार्ग, नवी दिल्ली असा असेल. सकाळी १०:१२ वाजता काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यांचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री, असे जवळपास ३०० मान्यवर काँग्रेस मुख्यालयाचे उद्घाटन करतील.
२८ डिसेंबर २००९ मध्ये या कार्यालयाचे भूमिपूजन झाले होते. लुटियन्स झोनमधील २४, अकबर रोडची ओळख गत पाच दशकांपासून भलेही काँग्रेसचे मुख्यालय अशी आहे. पण, हा पत्ता अनेक निर्णय, धोरणे आणि घटना यांचा साक्षीदार आहे. या मुख्यालयाने पक्षाचे सात अध्यक्ष पाहिले आहेत.
काय आहे इतिहास...
१९९८ मध्ये सोनिया गांधी यांचे सक्रीय राजकारण सुरु झाले. तसेच, केसरी यांना २४, अकबर रोड येथून निरोप देण्यात आला. सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर २४, अकबर रोडची प्रतिष्ठा वाढली.
या इमारतीत १९६१ मध्ये दोन वर्षे नोबेल शांती पुरस्कार विजेत्या आंग सान सू की येथे राहत होत्या. त्यावेळी २४, अकबर रोड बर्मा हाउस नावाने ओळखले जात होते. या इमारतीची निर्मिती इंग्रजांच्या काळात एडविन लुटियन्स यांनी १९११ आणि १९२५ च्या दरम्यान केली होती.