लोकसभेतील निलंबन रद्द; अधीर रंजन चौधरींची प्रतिक्रिया; म्हणाले, “चुकीचे बोललो असतो तर...”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 03:58 PM2023-08-31T15:58:41+5:302023-08-31T16:00:40+5:30
Congress MP Adhir Ranjan Chowdhury: माझ्या विधानाचा अर्थ नीट लावला नाही. सत्ताधारी नेत्यांनी पंतप्रधानांना खूष करण्यासाठी टीका करायला सुरुवात केली, असा पलटवार अधीर रंजन चौधरींनी केली.
Congress MP Adhir Ranjan Chowdhury: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत अधीर रंजन चौधरी यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. मात्र, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना नीरव मोदीशी केली होती. यामुळे अधीर रंजन चौधरी यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, आता अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने याबाबतचा निर्णय घेतला. यावर अधीर रंजन चौधरी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अधीर रंजन चौधरी यांच्या भाषणाचा वादग्रस्त भाग संसदेच्या रेकॉर्डवरून हटविण्यात आला होता. परंतु, त्याच्या पुढच्याच दिवशी चौधरी यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले होते. हे निलंबन मागे घेण्याची शिफारस करणारा ठराव विशेषाधिकार समितीने मंजूर केला आहे. यानंतर आता यासंदर्भात अधीर रंजन चौधरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
...तर सार्वजनिक जीवन सोडून देईन
मी काही चुकीचे बोलले असेल तर सार्वजनिक जीवन सोडून देईन. माझे म्हणणे ते समजू शकले नसतील असे मला वाटते. कारण संसदेत जे मी म्हटले होते ते योग्य आणि नियमाला धरुन होते. कायद्याच्या विरोधात असे काहीही मी बोललो नाही. माझ्या वक्तव्याचा अर्थ त्यांना नीट लावता आला नाही. मला संसदेत स्पष्टीकरण विचारले असते तर मी तेथेच त्यांना स्पष्टीकरण दिले असते, असे अधीर रंजन चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले.
पंतप्रधानांना खूष करण्यासाठी माझ्यावर टीका करायला सुरुवात केली
सत्ताधारी काही नेत्यांनी पंतप्रधानांना खूष करण्यासाठी माझ्यावर टीका करायला सुरुवात केली. संसदेत बोलण्याचा अधिकार आहे. नियमानुसारच आम्ही बोलत असतो. पण, सत्ताधाऱ्यांना ते आवडेल, न आवडेल. काँग्रेसविरोधात जे अपशब्द वापरले जातात ते सर्व रिकॉर्डवर आहेत.सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह सर्व काँग्रेस नेत्यांविरोधात संसदेत अपशब्द वापरले जातात. याचा विचार कोण करेल, असा प्रतिप्रश्न अधीर रंजन चौधरी यांनी केला.
दरम्यान, मी त्या दिवशीही सांगत होतो आणि आजही सांगतोय, संसदेत मी काही चुकीचे बोललो असेल तर मी पब्लिक लाईफ सोडून देईन. कारण मला पूर्ण विश्वास आहे मी काही चुकीचे बोललो किंवा चुकीचा शब्द वापरला नाही. कोणाला त्रास देण्यासाठी आम्ही संसदेत बोलत नाही, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.