कोट्यवधींचं घबाड! 5 लाखांच्या पाकिटावर 'इन्स्पेक्टर तिवारी'चं नाव; अधिकारीही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 05:29 PM2023-12-11T17:29:05+5:302023-12-11T17:43:10+5:30
पाच दिवस चाललेल्या या छाप्यात एकूण 351 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेस नेते धीरज साहू यांच्या घरात सापडलेल्या संपत्तीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. आयकर विभागाने त्याच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकून कोट्यवधींची रोकड जप्त केली आहे. पाच दिवस चाललेल्या या छाप्यात एकूण 351 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील साहू ग्रुपच्या कंपन्यांवर छापे टाकण्यात आले. या कालावधीत ओडिशास्थित बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडकडून 300 कोटी रुपये मिळाले.
176 बॅगमध्ये ही रक्कम ठेवण्यात आली होती. येथून वसूल केलेले पैसे मोजण्यासाठी 80 अधिकाऱ्यांच्या 9 टीम तैनात करण्यात आल्या आहेत, ज्यांनी 24 तासांच्या शिफ्टमध्ये काम केलं. मिळालेल्या माहितीनुसार, बलांगीरच्या सुदापाडा येथील दारू कंपनीच्या कार्यालयातील एक लॉकर कापून मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे. यामध्ये एका पाकिटात पाच लाख रुपये वेगळे ठेवलेले आढळून आले. या पॅकेटवर 'इन्स्पेक्टर तिवारी' असं लिहिले होते. हे पाहून आयकर अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं.
प्रत्येकाच्या मनात आता एकच प्रश्न येत आहे की हा 'इन्स्पेक्टर तिवारी' नेमका कोण आहे ज्याच्यासाठी पैसे वेगळे ठेवले आहेत. सध्या आयकर अधिकारी 'इन्स्पेक्टर तिवारी'चं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ही व्यक्ती पोलीस, उत्पादन शुल्क किंवा उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित अधिकारी असू शकते. काळा पैसा लपवण्यासाठी त्याला दरमहा पाच लाख रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. या छाप्यात 'इन्स्पेक्टर तिवारी'मुळे नवा ट्विस्ट आला आहे.
रेंज रोवर, BMW... 2018 मध्ये 34 कोटी, आता 350 कोटी; काँग्रेस नेत्याच्या संपत्तीचा 'सुपर स्पीड'
वाढत्या संपत्तीच्या बाबतीत काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांचा वेग रॉकेटपेक्षाही जास्त आहे. ओडिशा आणि झारखंडमधील त्याच्या घरातून 350 कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त करण्यात आली आहे. बेहिशेबी रोकड मोजण्यासाठी आणलेल्या नोटा मोजण्याच्या मशीन्स देखील बंद पडत आहेत. आयकर विभाग तीन दिवसांपासून त्यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या रोखीची मोजणी करत असून, रकमेचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. धीरज प्रसाद साहू 2018 मध्ये झारखंडमधून काँग्रेसचे राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले होते की, त्यांच्याकडे 34 कोटी रुपयांची संपत्ती आहे आणि आता त्यांची संपत्ती इतकी वाढली आहे की चलनी नोटांचे बंडल कपाटात मोठ्या प्रमाणात सापडले आहेत.