गुवाहाटी: झारखंडमधील खराब कामगिरीवरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळेच भाजपाला झारखंडमध्ये पराभव पत्कारावा लागल्याचं आझाद यांनी म्हटलं. महाराष्ट्र, हरयाणातील विधानसभा निवडणुकांमध्येदेखील भाजपाची कामगिरी ढासळली. कारण या निवडणुकांच्या आधी मोदी सरकारनं काश्मीरमधून कलम ३७० काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता, असं आझाद म्हणाले. तुम्ही जितकी वादग्रस्त विधेयक आणाल, तितक्या जास्त जागा गमवाल, अशा शब्दांत आझाद यांनी भाजपाच्या निवडणुकीतील कामगिरीवर टोलेबाजी केली. भाजपानं महाराष्ट्र, हरयाणातील निवडणुकीच्या महिनाभर आधी काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. यानंतर हरयाणात त्यांना इकडून तिकडून आमदारांची जुळवाजुळव करुन सत्ता राखावी लागली. यानंतर त्यांनी देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी देशभरात लागू करण्याची विधानं केली. त्यामुळे त्यांनी झारखंड गमावलं. आता दिल्लीतही ते पराभूत होतील, असं आझाद म्हणाले. ते गुवाहाटीत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना दिलेली आश्वासनं पूर्ण करत नसल्याचंदेखील आझाद यांनी सांगितलं. '२०१४ च्या निवडणुकीपूर्वी मोदींनी काळा पैसा भारतात आणण्याचं, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र काळा पैसा भारतात आलाच नाही. रोजगार देण्यात, महागाई करण्यातदेखील ते अपयशी ठरले. उलट मोदींच्या कार्यकाळात पेट्रोल, डिझेल, एलपीजीच्या किमती वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं. मात्र कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहेत,' अशा शब्दांत आझाद यांनी मोदींच्या आश्वासनांचा समाचार घेतला.
काँग्रेसला सापडला निवडणूक विजयाचा मंत्र; भाजपाला खोचक सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 11:51 AM