'महाराष्ट्राचा विकास होत असताना भाजपाचे नेते 'शाखां'मध्ये होते'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 05:48 PM2019-09-05T17:48:41+5:302019-09-05T17:52:46+5:30
महाराष्ट्राचा विकास होत असताना भाजपाचे आजचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये लाठ्या-काठ्या फिरवित होते, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार हुसैन दलवाई यांनी लगावला आहे.
नवी दिल्ली - महाराष्ट्राचा विकास होत असताना भाजपाचे आजचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये लाठ्या-काठ्या फिरवित होते, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार हुसैन दलवाई यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काहीच केले नाही, असा आरोप भाजपाचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. यावरून महाराष्ट्रात वाद सुरू झाला आहे. छाननी समितीच्या बैठकीसाठी हजर राहिल्यानंतर या वादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार हुसैन दलवाई म्हणाले, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने या राज्याची बांधणी राज्यातील नेत्यांनी अत्यंत धोरणीपणाने केली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. यामागे केवळ एका राज्याची निर्मिती नव्हती तर पुरोगामी व विकासशील महाराष्ट्र घडविण्याचा दृढसंकल्प करून ते आले होते.
हाच वारसा पुढे वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख यांनी चालविला. या नेत्यांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्र हे देशातील अव्वल राज्य घडले आहे. महाराष्ट्राने सर्व क्षेत्रात प्रगती केली. हे गेल्या पाच वर्षातील देण नाही. महाराष्ट्र विकासाची एक एक पल्ला गाठत होता, त्यावेळी आजचे भाजपचे नेते संघ शाखांमध्ये लाठ्या-काठ्या फिरवित होते. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास कसा झाला, याची माहिती या नेत्यांना नाही, असा टोला त्यांनी हाणला.