'रात्रभर इंटरनेट बंद करूनही माझा डेटा संपला'; संसदेत उपस्थित प्रश्नावर भाजपाचं मजेशीर उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 03:58 PM2022-12-15T15:58:50+5:302022-12-15T16:06:34+5:30
काँग्रेस खासदार जसबीर सिंग गिल यांनी इंटरनेट डेटाच्या बाबतीत काही प्रश्न संसदेत उपस्थित केले.
नवी दिल्ली: सध्याच्या युगात मोबाईल डेटाचा वापर खूप वाढला आहे. लोकांना आता दररोज ३ जीबीपर्यंत डेटा मिळतो. दूरसंचार कंपन्या स्वस्त प्रीपेड योजना देखील देतात. परंतु, अनेक वेळा युजर्स सोशल मीडियावर तक्रार करतात की, त्यांचा डेटा लवकर संपतो. अनेक वेळा वेळेपूर्वी डेटा संपल्याचा मेसेज येतो. सदर प्रकार काँग्रेसच्या खासदारासोबतही घडल्याचे समोर आले आहे.
काँग्रेस खासदार जसबीर सिंग गिल यांनी इंटरनेट डेटाच्या बाबतीत काही प्रश्न संसदेत उपस्थित केले. एअरटेल आणि जिओ उघडपणे वापरकर्त्यांना लूटत आहेत. रात्री फोन बंद करून झोपला आणि सकाळी उठला तर डेटा संपतो, असा प्रकार घडत असल्याचं जसबीर सिंग गिल यांनी संसदेत सांगितलं. तसेच हीच समस्या माझ्यासह अनेक नागरिकांनाही येत असल्याची माहिती जसबीर सिंग गिल यांनी दिली.
जसबीर सिंग गिल यांच्या या प्रश्नावर केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट उत्तर न देता तुम्ही भूतांबद्दल बोलत आहात का?, असा सवाल विचारला. तसेच हेच भूत आधी १ जीबी डेटासाठी २०० रुपये घेत होते, असं म्हणत अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला. आता १ जीबी डेटासाठी २० रुपयांपेक्षा कमी खर्च करावा लागतोय. यूपीए सरकारच्या काळात बीएसएनएलचा बराच निधी वळवण्यात आला, त्यामुळे कंपनीची अवस्था वाईट असल्याचा आरोपही वैष्णव यांनी केला.
दरम्यान, इंटरनेट ही आजच्या युगातील एक मूलभूत गरज आहे. रोजच्या जीवनातील अनेक गोष्टी आता इंटनेटवर अवलंबून असल्याने त्याशिवाय आयुष्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. हीच बाब लक्षात घेऊन मोबाईल डेटा पॅकचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे जर आपल्याला महिन्याला मिळणारा डाटा वापरण्याचे आपण नियोजन केले नाही तर आपल्याला जास्तीचा भुरदंड बसु शकतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"