नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या दोन्ही मतदारसंघातून ते बहुमताने निवडून आले आहेत. मात्र, आता राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला असून ते रायबरेली मतदारसंघातून आपली खासदारकी कायम ठेवणार आहेत. तर राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी या वायनाडमधून आता पोटनिवडणूक लढविणार आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी या निर्णयाबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून हा योग्य निर्णय असल्याचे म्हटले आहे.
प्रमोद तिवारी म्हणाले, मला राहुल गांधी यांचे आभार मानायचे आहेत, त्यांनी रायबरेली मतदारसंघातून खासदार राहण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. तर प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. अशा प्रकारे दोन्ही सदस्यांचे प्रतिनिधित्व असणार आहे. या निर्णयाने त्यांनी इंडिया आघाडीला ८० पैकी ४३ जागा देणाऱ्या उत्तर प्रदेशच्या जनादेशाचाही सन्मान केला आहे. तसेच, त्यांनी उत्तर प्रदेशच्या भावनांचाही आदर केला आहे. तर प्रियंका गांधी या वायनाडमधून ५ लाख मतांनी विजयी होतील, असा दावा प्रमोद तिवारी यांनी केला आहे.
दरम्यान, याआधी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडण्याचा आणि प्रियंका गांधी तिथून पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्याशिवाय काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि प्रियांका गांधीही उपस्थित होत्या.
प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणातप्रियंका गांधी या वायनाड पोटनिवडणुकीत विजयी झाल्या तर त्या पहिल्यांदाच खासदार म्हणून संसदेत प्रवेश करतील. दरम्यान, प्रियंका गांधी या २०१९ मध्ये सक्रिय राजकारणात आल्यापासून अमेठी, रायबरेली आणि वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची सतत चर्चा होत होती. त्या काँग्रेसट्आ उत्तर प्रदेशमधील प्रभारी आहेत. तसेच, काँग्रेसच्या रणनीतीकार आणि स्टार प्रचारक म्हणून ओळखल्या जातात. अलीकडेच त्यांनी काही राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाला मोलाची साथ दिली आहे.