वायनाड (केरळ) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून शनिवारी पुन्हा एकदा हल्लाबोल केला. मणिपूर हिंसाचारावर संसदेत झालेल्या चर्चेत पंतप्रधान २ तासांपेक्षा अधिक वेळ बोलले, पण त्यांनी ईशान्येतील या राज्याच्या समस्येवर कोणताही तोडगा काढला नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतर राहुल गांधी हे प्रथमच आपल्या वायनाड मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यानिमित्त काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने (यूडीएफ) कलपेट्टा येथे त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘ते (पंतप्रधान) २ तास १३ मिनिटे बोलले. ते हसले... त्यांनी विनोद केले... मस्करी केली, त्यांच्या मंत्र्यांनीही हास्यविनोद केले. त्यांनी खूप गंमती-जमती केल्या. पंतप्रधान २ तासांच्या भाषणात प्रत्येक विषयावर बोलले... काँग्रेसवर, माझ्यावर, विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’वर ते विस्ताराने बोलले; पण मणिपूरवर केवळ २ मिनिटेच बोलले.’
राहुल गांधी यांनी म्हटले की, भाजप आणि त्याच्या नेतृत्वाखालील सरकारने मणिपुरात ‘भारतीय संकल्पने’चीच (आयडिया ऑफ इंडिया) हत्या केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटले की, ‘भारतमातेच्या हत्येवर बोलताना तुम्ही केवळ २ मिनिटे खर्च केलीत. तुमची हिंमत कशी झाली? तुम्ही ‘भारतीय संकल्पना’ फेटाळूच कशी शकता? (वृत्तसंस्था)
४ महिने तुम्ही काय करत होतात?
राहुल गांधी यांनी म्हटले की, मागील ४ महिने तुम्ही काय करत होतात? तुम्ही तेथे (मणिपुरात) का नाही गेलात? तुम्ही हिंसाचार थांबविण्याचा प्रयत्न का नाही केला? कारण तुम्ही राष्ट्रवादी नाहीच आहात. ‘भारतीय संकल्पने’ची हत्या करणारा राष्ट्रवादी होऊच शकत नाही.