Rahul Gandhi: मोदी आडनाव मानहानी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात आली. तत्पूर्वी खासदारकी रद्द झाल्यामुळे राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडावा लागला होता. आता पुन्हा खासदारकी मिळाल्यामुळे राहुल गांधी यांना जुना सरकारी बंगला देण्यात येणार आहे. परंतु, जुना सरकारी बंगला स्वीकारण्यास राहुल गांधी यांनी नकार दिल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ तुघलक लेन येथे राहुल गांधी यांचा सरकारी बंगला होता. खासदारकी पुन्हा बहाल केल्यानंतर तोच बंगला राहुल गांधी यांना देण्यात येणार होता. यासंदर्भात लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांच्याशी संपर्क करत, जुने घर पाहिजे की नको याबाबत राहुल गांधी यांना विचारणा केली होती. राहुल गांधी यांनी लोकसभा हाऊसिंग सोसायटीला एक पत्र लिहिले असून, जुना सरकारी बंगला नाकारला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
१२ तुघलक लेन नव्हे तर ७ सफदरजंग लेन असू शकते नवे घर
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे घर १२, तुघलक लेन नव्हे तर ७, सफदरजंग लेन असू शकते. सध्या राहुल गांधी १२ तुघलक लेनच्या जागी नवीन पर्यायाच्या शोधात आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या मातोश्री सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका गांधी यांच्याबरोबर २ वेळा ७, सफदरजंग लेनस्थित घर पाहिले आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी जुना सरकारी बंगला नाकारल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, हा बंगला राहुल गांधी यांच्यासाठी विशेष आहे, कारण याच्या शेजारीच इंदिरा गांधी यांचे संग्रहालयही आहे. हा बंगला टाइप ७च्या श्रेणीत येतो. यात ४ बेडरूम आहेत. राहुल गांधी यांच्या झेड प्लस सुरक्षा श्रेणीमध्ये हा बंगला योग्य बसतो. सध्या हे घर महाराज रणजित सिंह गायकवाड यांना दिलेले आहे.