नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक व्हावी या मागणीसाठी २३ एप्रिलपासून देशातील नामांकित पैलवान आंदोलन करत आहेत. एक महिना उलटून गेल्यानंतरही सरकारकडून काही ठोस आश्वासन अथवा आंदोलनाची दखल न घेतली गेल्याने आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी रविवारी नवीन संसद भवनासमोर निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला पण दिल्ली पोलिसांनी धरपकड करून आंदोलन दडपले. पैलवानांच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले असून विविध राजकीय पक्ष सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहेत.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. २५ आंतरराष्ट्रीय पदके जिंकून आणणाऱ्या मुली रस्त्यावर उतरून न्यायासाठी याचना करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. "२५ आंतरराष्ट्रीय पदके जिंकून आणणाऱ्या मुली रस्त्यावर उतरून न्यायासाठी याचना करत आहेत. २ एफआयआरमध्ये लैंगिक छळाचे १५ गंभीर आरोप असलेले खासदार - पंतप्रधानांच्या 'सुरक्षा कवच'मध्ये सुरक्षित. मुलींच्या या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार आहे", असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
आखाड्याबाहेरील कुस्ती २३ एप्रिलपासून सुरू असलेली आखाड्याबाहेरील कुस्ती अद्याप सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी जागतिक पातळीवर जिंकलेली पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी आंदोलकांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे गंगातीरी हजेरी लावली. पण शेतकरी नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पैलवानांनी पदकं विसर्जित करण्याचा निर्णय तूर्तास मागे घेतला.
पैलवानांवर गुन्हे दाखल रविवारी एकिकडे नवीन संसद भवनाचं उद्घाटन पार पडलं, तर दुसरीकडे या नव्या वास्तूसमोर आंदोलन करू पाहणाऱ्या पैलवानांची दिल्ली पोलिसांनी धरपकड केली. पैलवानांचे आंदोलन दडपल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. खरं तर पैलवानांवर दिल्ली पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हे देखील दाखल केले आहेत.