नवी दिल्ली - पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर, काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक (Congress Working Committee Meeting) पार पडली. या बैठकीत निवडणुकीतील पराभवाबरोबरच पक्षातील पुढील आव्हाने काय आहेत, यावरही चर्चा झाली. तसेच या CWC बैठकीत पक्ष भविष्यात तरुणांवर लक्ष केंद्रित करेल, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले. (Party Will Focus On Youth)
देशाच्या डेमोग्राफीचा (Demographic Profile Of The Country) संदर्भ देत राहुल म्हणाले, हाच मार्ग आहे, ज्यावर पक्षाने पुढील वाटचाल करायला हवी. राहुल गांधींच्या या वक्तव्याकडे, पक्षाच्या शीर्ष नेतृत्वावर सातत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या, पक्षातील असंतुष्ट नेत्यांच्या G-23 गटावर निशाणा म्हणूनही पाहिले जात आहे.
गुजरात निवडणुकीत केला जाऊ शकतो भाजपचा पराभव -पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि युथ फॅक्टरचा हवाला देत, पक्ष पुन्हा मजबूत करण्यासाठी या वर्गावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, या बैठकीत पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाभोवतीच चर्चा फिरत होती. यानंतर जयराम रमेश यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देत, AICC सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या, पक्षाने उत्तर प्रदेश निवडणुकीत 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुष आणि महिलांना 60% तिकिटे दिली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी जयराम रमेश यांच्या म्हणण्यावर सहमती दर्शवली आणि भविष्यात तरुणांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर पक्षाने चांगल्या पद्धतीने रणनीती आखून पुढे वाटचाल केल्यास येणाऱ्या गुजरात निवडणुकीत भाजपचा पराभव केला जाऊ शकतो, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.