Rahul Gandhi And Lalu Prasad Yadav: भाजपला तगडी टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडी सज्ज झाली आहे. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. यामध्ये सर्व विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकजुटीने लढण्यावर भर देण्यात आला. तसेच जागावाटपावर चर्चा झाल्याचे समजते. यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राजद नेते लालू प्रसाद यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी काही प्रश्न विचारले. त्याला लालू प्रसाद यादव यांनी उत्तरे दिली.
राहुल गांधी यांनी यादव कुटुंबाकडून जाणून घेतलं की लालूप्रसाद यादव कसे आहेत? झटकेबाज पाणीपुरीचा आस्वादही घेतला. दोन बडे नेते भेटल्यानंतर ज्या औपचारीक आणि अनौपचारीक गप्पा होतात त्या झाल्या. इंडिया आघाडीचे राजद आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. मुंबईतली बैठक पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी गेले होते.
BJP देशात इतका तिरस्कार का पसरवते?
राहुल गांधींनी लालूप्रसाद यादव यांना भाजपाविषयी प्रश्न विचारले. त्यावर लालूप्रसाद यादव यांनी उत्तर दिले आहे. भाजपावाले तिरस्कार का पसरवतात, असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. यावर, भाजपाला सत्तेची भूक प्रचंड आहे. त्यातूनच तिरस्काराचे राजकारण केले जाते, असे लालू प्रसाद यादव म्हणाले. जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते तेव्हा तिरस्काराचे राजकारण केले जात नाही आणि अर्थव्यवस्था बिघडली की हे राजकारण केले जाते असे तुम्हाला वाटते का? असे राहुल गांधींनी विचारले. यावर उत्तर देताना लालू प्रसाद म्हणाले की, हे अगदी खरे आहे. हे लोक इतका दुष्प्रचार करतात, इतके ब्रेनवॉश करतात की लोकांची मते बदलून जातात.
दरम्यान, लालूजी तुम्हाला हे वाटते का या मागे भाजपाचा उद्देश लोकांचे पैसे लुटणे असतो, असा सवाल राहुल गांधींनी केला. यावर, अत्यंत स्वच्छपणे हेच लक्ष्य असते. त्यामुळेच गरिबांची घरे जाळली जातात, त्यांना त्रास दिला जातो. कट करण्याचे राजकारण भाजप कायमच करत आले आहे, असे सांगत लालू प्रसाद यादव यांनी टीका केली. माझा सल्ला तुम्हाला हा आहे की, तुमचे आई वडील, आजी-आजोबा यांनी जे देशाला नवी दिशा दाखवली, चांगल्या मार्गावर नेले ते विसरु नका. विकासाचे राजकारण करा. देशातील तिरस्कार संपववणे खूप आवश्यक आहे, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.