Hathras Stampede : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी हाथरत पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. अलीगढ येथील पिलखाना येथे हाथरस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी राहुल गांधी पोहोचले होते. यावेळी राहुल गांधी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या दुर्घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, असेही राहुल गांधी म्हणाले. मंगळवारी हाथरस येथे भोले बाबा यांच्या सत्संग कार्यक्रमात १२१ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
राहुल गांधी यांचा ताफा सकाळी साडेसात वाजता पिलखान्यात पोहोचला. त्यानंतर राहुल गांधी यांनी हाथरसच्या फुलरई येथे सत्संग कार्यक्रमात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या घटनेत प्रशासनाची उणीव जाणवली आहे तसेच अनेक कुटुंबांचे नुकसान झाले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं. यासोबत काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी आहे आम्ही तुम्हाला मदत करु असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.
"या घटनेमुळे अनेक कुटुंबांचे नुकसान झालं असून अनेक लोक मरण पावले आहेत. मला याचे राजकारण करायचे नाही. प्रशासनाच्या व्यवस्थेत अनेक उणिवा आहेत. मला वाटतं त्यांना जास्त भरपाई मिळायला हवी कारण ही खूप गरीब कुटुंबं आहेत. मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना मोकळ्या मनाने नुकसान भरपाई देण्याची विनंती करतो. पीडितांच्या कुटुंबियांना आता त्याची गरज आहे. त्यामुळे लवकरात लवकर अधिक भरपाई द्यावी. मी त्यांच्या कुटुंबियांसोबत बोलताना त्यांनी सांगितले की घटनेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरेसा नव्हता," असे राहुल गांधी म्हणाले.
दुसरीकडे, अलीगढमधील एका पीडित कुटुंबातील सदस्याने सांगितले की, "राहुल गांधींनी आम्हाला मदतीचे आश्वासन दिले होते. पक्षाच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण मदत केली जाईल, असे राहुल गांधी सांगितले. त्यांनी आम्हाला संपूर्ण घटनेबद्दल आणि ते कसे घडले याबद्दल विचारले."
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी या कार्यक्रमाच्या आयोजन समितीशी संबंधित सहा जणांना अटक केली. पोलिसांच्या अंतर्गत तपास अहवालात व्यवस्थापन आणि सुरक्षा प्रोटोकॉलमधील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत.