...तर 'त्या' दिवशी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हटलं जाईल; राहुल यांचा मोदींवर हल्लाबोल

By कुणाल गवाणकर | Published: December 24, 2020 12:52 PM2020-12-24T12:52:36+5:302020-12-24T12:53:03+5:30

सरकारला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील; काँग्रेसचा मोदी सरकारविरोधात एल्गार

congress mp rahul gandhi slams pm narendra modi over farm laws | ...तर 'त्या' दिवशी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हटलं जाईल; राहुल यांचा मोदींवर हल्लाबोल

...तर 'त्या' दिवशी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हटलं जाईल; राहुल यांचा मोदींवर हल्लाबोल

Next

नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ मोजक्या उद्योगपतींसाठी काम करत आहेत. सरकारविरोधात उभ्या राहणाऱ्यांना दहशतवादी ठरवलं जात आहे. मग ते शेतकरी असो, मजूर असोत. एखाद्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत मोदींविरोधात उभे राहिल्यास त्यांनाही दहशतवादी म्हटलं जाईल, अशा शब्दांत राहुल यांनी मोदींवर हल्लाबोल केला.




गेल्या महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसनंदेखील कृषी कायद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत आज मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र काँग्रेस मुख्यालयाबाहेर कलम १४४ लागू करण्यात आलं. त्यानंतर प्रियंका गांधी यांच्यासह काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं.




राहुल गांधी यांच्यासह आणखी दोन नेत्यांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी देण्यात आली. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर त्यांनी मोदींवर घणाघाती हल्ला चढवला. 'पंतप्रधान मोदी मोजक्या उद्योगपतींसाठी काम करतात, हे शेतकऱ्यांना माहीत आहे. कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलक शेतकरी घरी परतणार नाहीत, ही गोष्ट पंतप्रधान मोदींनी लक्षात घ्यावी. सरकारनं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं संयुक्त अधिवेशन घेऊन नवे कायदे रद्द करावेत,' असं राहुल म्हणाले.




प्रियंका गांधींसह इतर नेत्यांना ताब्यात घेतल्याबद्दलही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 'अटक करायची, ताब्यात घ्यायचं हीच यांच्या कामाची पद्धत आहे. देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. लोकशाही केवळ कल्पनेत जिवंत असू शकते. पण प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात नाही,' अशी टीका राहुल यांनी केली. चिनी सैन्यानं भारताची हजारो किलोमीटर जागा बळकावली. त्याबद्दल पंतप्रधान मोदी का बोलत नाहीत? ते गप्प का आहेत?, असे प्रश्नदेखील त्यांनी विचारले.

Web Title: congress mp rahul gandhi slams pm narendra modi over farm laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.