काँग्रेस खासदार राजीव सातव यांना गुजरात पोलिसांकडून बेदम मारहाण, दंगलीचा गुन्हा केला दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 04:39 AM2017-12-04T04:39:30+5:302017-12-04T04:40:21+5:30
काँग्रेस पक्षाचे हिंगोलीचे खासदार व सौराष्ट्राचे प्रभारी राजीव सातव व अन्य चार काँग्रेस पदाधिका-यांना राजकोट पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
राजकोट : काँग्रेस पक्षाचे हिंगोलीचे खासदार व सौराष्ट्राचे प्रभारी राजीव सातव व अन्य चार काँग्रेस पदाधिका-यांना राजकोट पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या मारहाणीत सातव यांच्यासह हिंगोलीचे नगरसेवक अनिल लेनवानी, काँग्रेसचे जालना येथील कार्यकर्ते राजेंद्र राथ, अ. भा. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष कुंडल, नरेंद्र खबर हे कार्यकर्तेही जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी- मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याविरोधात राजकोट (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील राजगुरू यांची पोस्टर्स दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फाडली होती. त्याच ठिकाणी पुन्हा पोस्टर्स लावण्याकरिता इंद्रनील यांचे बंधू दीपगुरु गेले असता भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. दीपगुरु यांच्या जखमेवर टाके घालण्यात आले असून ते सध्या इस्पितळात आहेत. या घटनेमुळे संतप्त झालेले इंद्रनील
यांनी मुख्यमंत्री रुपाणी यांच्या घरासमोर धरणे आंदोलन सुरू
केले.
मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली व त्यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल केले. सातव हे शनिवारी रात्री प्रचारावरुन परतले तेव्हा त्यांच्या कानावर हा प्रकार गेल्याने ते पोलीस मुख्यालयात गेले. तेथे मीडिया मोठ्या संख्येने हजर होता.
काँग्रेस उमेदवाराला सोडत नसल्याच्या निषेधार्थ सातव यांनी पोलिस मुख्यालयासमोरच ३० ते ३५ कार्यकर्त्यांसह धरणे धरले. तेथील पोलीस उपायुक्त वाघेला यांनी सातव व अन्य काही प्रमुख कार्यकर्त्यांना मुख्यालयात बोलावून त्यांना सराईत गुन्हेगार असल्यासारखी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यामध्ये सातवसह नगरसेवक लेनवानी यांना जबर मार लागला. राथ यांचा हात फ्रॅक्चर झाला.
मारहाण केल्यावर पोलिसांनी या साºयांना आत नेऊन बसवले. एका पोलीस हवालदाराच्या हाताला इजा झाल्यामुळे तुमच्यावरही गुन्हा दाखल करावा लागेल, असे पोलिसांनी सातव यांना सांगितले. त्यावर राहुल गांधी यांच्यासह देशातील काँग्रेसचे सर्व नेते जोपर्यंत येथे येत नाही तोपर्यंत आम्ही येथून बाहेर जाणार नाही, असा पवित्रा सातव यांनी घेतल्यावर हे प्रकरण चिघळणार, असे लक्षात आल्यावर पहाटे सातव यांना सोडून देण्यात आले.
संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली तोडफोड
खा. सातव यांना झालेल्या मारहाणीचे हिंगोली जिल्ह्यात पडसाद उमटले. संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिंगोली जिल्ह्यात पंतप्रधानांचे प्रतीकात्मक पुतळे जाळले, बस फोडल्या. औंढ्यात भाजपा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. प्रत्युत्तरात भाजपा कार्यकर्त्यांनीही सातव यांचे कार्यालय फोडले. परभणीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन केले.
नेमके काय घडले गुजरातमध्ये?
काँग्रेस उमेदवार इंद्रनील राजगुरू यांच्या भावाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ राजगुरू यांनी मुख्यमंत्री रुपाणी यांच्या घरासमोर धरणे धरले. त्यावरून पोलिसांनी त्यांना अटक केली. राजगुरू यांना सोडा, या मागणीसाठी खा. सातव पोलिसांकडे गेले, मात्र त्यांना व सोबतच्या कार्यकर्त्यांनाच पोलिसांनी मारहाण केली.
मी गेले सहा महिने गुजरातमध्ये प्रचार करीत असून खासदार आहे, याची कल्पना असतानाही पोलिसांनी हेतूत: मला व माझ्या सोबतच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. मुख्यमंत्री रुपाणी यांना पराभव समोर दिसत असल्याने ते सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत आहेत.
- राजीव सातव, खासदार, काँग्रेस
(हिंगोली लोकसभा मतदारसंघ)