काँग्रेस खासदार थरूर यांच्या अटकेचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 03:47 AM2019-08-14T03:47:27+5:302019-08-14T03:48:36+5:30
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पूर्वी केलेल्या एका विधानावरून येथील न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश मंगळवारी जारी केले.
कोलकाता : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी पूर्वी केलेल्या एका विधानावरून येथील न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश मंगळवारी जारी केले. भाजप जर पुन्हा सत्तेवर आला तर ते घटना पुन्हा लिहितील व ‘हिंदू पाकिस्तान’च्या निर्मितीचा मार्ग मोकळा होईल, असे थरूर यांनी म्हटले होते.
विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता व भाजपने या विधानाबद्दल थरूर यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. मुख्य महानगर दंडाधिकारी दीपांजन सेन यांनी वकील सुमित चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर थरूर यांच्याविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. थरूर यांच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये विसंवादाला प्रोत्साहन मिळते, असा दावा चौधरी यांनी केला होता. याप्रकरणी आता २४ सप्टेंबर रोजी सुनावणी होईल. थरूर यांच्या वतीने न्यायालयात मंगळवारच्या सुनावणीवेळी कोणीही वकील नव्हता, त्यामुळे अटकेचे वॉरंट जारी केले गेले, असे चौधरी म्हणाले. थरूर यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ च्या कलम दोनचे उल्लंघनही झाले, असा दावाही चौैधरी यांनी केला होता.