नवी दिल्ली : 'हिंदू पाकिस्तान' विधानावरुन भाजपानं काँग्रेस खासदार शशी थरुर यांना लक्ष्य केलं आहे. अल्पसंख्यांकांच्या मतपेढीला डोळ्यासमोर ठेवून थरुर यांनी हिंदूंची बदनामी केल्याची टीका भाजपानं केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधण्यासाठी काँग्रेसकडून लोकशाहीवर हल्ला केला जात असल्याचं भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. थरुर यांचं विधान हा हिंदूंवरील हल्ला असल्याचंही ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणूक भाजपानं जिंकल्यास भारताचा हिंदू पाकिस्तान होईल, असं शशी थरुर काल तिरुअनंतपुरममधील एका कार्यक्रमात म्हणाले होते. थरुर यांच्या विधानावर भाजपानं सडकून टीका केली. मात्र काँग्रेसच्या एकाही नेत्यानं थरुर यांची बाजू मांडलेली नाही. शशी थरुर त्यांच्या विधानावर ठाम आहेत. उलट त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाजपावरील हल्ला आणखी तीव्र केला आहे. 'मी आधीही हे म्हटलं आहे आणि मी पुन्हा तेच म्हणेन. पाकिस्तानचा जन्म एका विशेष धर्माच्या लोकांसाठी झाला. पाकिस्तानमध्ये कायम अल्पसंख्यांकांना अधिकार नाकारण्यात आले. त्यांनी कायम अल्पसंख्यांकांसोबत भेदभाव केला. भारतानं कधीच असं केलं नाही. भारतानं धर्माच्या आधारे कधीही कोणासोबत भेदभाव केला नाही,' असं थरुर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'हिंदू पाकिस्तान' विधानावर शशी थरुर ठाम; भाजपा-काँग्रेसमध्ये घमासान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 2:41 PM