नवी दिल्लीः राफेल करारावर लोकसभेत जोरदार चर्चा सुरू असताना एक बालिश प्रकार घडला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि केंद्र सरकारवर केलेल्या आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उत्तरं देत असताना काँग्रेसच्या काही खासदारांनी सभागृहात कागदी विमानं उडवली. हा पोरखेळ पाहून सभापती सुमित्रा महाजन चांगल्याच चिडल्या आणि त्यांनी खासदारांना खडे बोल सुनावले.
यूपीएच्या काळात झालेला १२६ विमानांचा करार मोदी सरकारने ३6 विमानांवर का आणला? या विमानांची किंमत अचानक एवढी कशी वाढली? आणि ४५ हजार कोटींचं कर्ज असणाऱ्या अनिल अंबानींना हे कंत्राट का देण्यात आलं?, असे रोखठोक सवाल करत राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलं. माझ्यावर वैयक्तिक आरोप नाहीत, असं मोदी मुलाखतीत म्हणाले. पण अख्ख्या देशाला त्यांच्याकडूनच उत्तर हवंय, असा टोला त्यांनी हाणला.
काँग्रेसच्या या आरोपांना सरकारच्या वतीने अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिलं. बालवाडीतल्या मुलालाही जे कळेल, ते राहुल गांधींना कळत नाहीए. ज्या पक्षाचं नेतृत्व दिग्गजांनी केलंय, त्या पक्षाच्या आजच्या अध्यक्षाला लढाऊ विमानांमधलं काही कळत नाही, अन्यथा त्यांनी राफेलच्या किंमतीवरून आणि या करारावरून असे आरोप केले नसते. देशात काही लोक आणि कुटुंब अशी आहेत, ज्यांना पैशाचं गणित समजतं, पण देशाच्या सुरक्षेशी त्यांना घेणंदेणं नाही, हे देशाचं दुर्दैवच आहे, असा पलटवार अरुण जेटली यांनी राहुल गांधींवर केला.
या फैरी झडत असतानाच, काँग्रेसचे खासदार गुरजीतसिंग ओजला यांनी अरुण जेटली यांच्या दिशेनं कागदी विमान उडवलं. ही बाब संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा, सुमित्रा महाजन चिडल्या. लहानपणी शाळेत असताना विमानं उडवली नाहीत का?, हा असा बालिशपणा ताबडतोब थांबवा, अशी तंबी सभापतींनी गुरजीतसिंग, सुष्मिता देव आणि राजीव सातव यांना दिली. त्यानंतर सभागृहातील गोंधळ अधिकच वाढल्यानं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावं लागलं.