नवी दिल्ली - आसाममधीलपूरस्थिती गंभीर झाली आहे. 21 जिल्ह्यांतील 14 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिरंग, बारपेट आणि बक्सा या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने जमीन वाहून गेली आहे. 1556 गावे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळेच आसाममधीलपूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा अशी मागणी आसामच्या खासदारांनी केली आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 21 जिल्ह्यांना पुराने घेरले आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांत धेमजी, लखीमपूर, बिस्वनाथ, सोनीतपूर, दारंग, बक्सा, बारपेट, नालबारी, चिरंग, बोंगाईगाव, कोक्राझार, गोलपाडा, मोरीगाव, होजई, गोलाघाट, मजुली, जोरहाट, शिवसागर, दिब्रुगढ आणि तीनसुकिया यांचा समावेश आहे. पुराचा सर्वाधिक फटका बारपेट जिल्ह्याला बसला आहे. या जिल्ह्यातील 3.5 लाख लोक पुराच्या तडाख्यात सापडले आहेत. त्याखालोखाल धेमजी जिल्ह्यातील 1.2 लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. बोंगाईगाव जिल्ह्यातील 62,500 नागरिक पुराच्या तडाख्यात सापडले आहेत.
बक्सा जिल्ह्यात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या पथकाने आतापर्यंत 850 नागरिकांची पुरातून सुखरूप सुटका केली आहे. नदी काठावर बांधण्यात आलेले कूस, रस्ते, पूल आणि इतर बांधकामे वाहून गेली आहेत. प्रशासनाने 11 जिल्ह्यांत 68 मदत छावण्या उभारल्या आहेत. त्यामध्ये हजारो लोकांनी आश्रय घेतला आहे.
बिहारमध्ये देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांना या जोरदार पावसाचा फटका बसला आहे. वादळी वारा आणि वीज पडल्यामुळे आतापर्यंत बिहारमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर आसाममध्ये पावसामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
पंजाब आणि हरियाणामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. हरियाणातील अंबाला भागात मुसळधार पाऊस पडत असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. नागरिकांची घरं आणि सार्वजनिक मालमत्ता यांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यावरील झाडं उन्मळून पडली आहेत. तसेच परिसराचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत अशाच पद्धतीचा जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
नेपाळमध्ये पावसाचा कहर; 65 जणांचा मृत्यू, 38 जखमीनेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीचा नेपाळला तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. 38 जण जखमी झाले असून 30 जण बेपत्ता झाले असल्याची माहिती मिळत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आला असून दरड कोसळल्या आहेत. तसेच महामार्ग पावसामुळे प्रभावित झाले आहेत. अनेक नद्यांचे तट तुटले असून जवळच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.