नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली. त्यामुळे लोकसभेतील नेता ठरवण्यासाठी देखील काँग्रेसला बराच वेळ लागला. लोकसभा अधिवेशन सुरू झाल्यानंतर आज अखेर काँग्रेसने लोकसभेतील विरोधीपक्ष नेत्याचे नाव जाहीर केले. अधीर रंजन चौधरी यांच्याकडे काँग्रेसने लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपविली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद नाकारले होते. त्यानंतर अधीर रंजन चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या संदर्भात राहुल यांनी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी देखील चर्चा केली होती. काँग्रेस पक्षाकडून लोकसभेला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, अधीर रंजन चौधरी लोकसभेत विरोधीपक्षनेते असतील. तसेच सर्व महत्त्वाच्या घटकांचे आणि समित्याचं ते प्रतिनिधीत्व करतील.
तत्पूर्वी १७व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रापूर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौधरी यांचे कौतुक केले होते. रविवारी मोदींनी चौधरी यांना फायटर म्हणून संबोधले होते. बैठकीनंतर मोदींनी चौधरी यांना जवळ बोलवून त्यांची पाठ थोपटली होती. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. पंतप्रधानांनी कौतुक केल्यानंतर चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींनी कौतुक केल्यामुळे आनंद झाला. आपलं कुणाशीही वैर नाही. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. ते देखील भाजपचे प्रतिनिधी आहेत. आम्ही आमचा आवाज उठवू ते त्यांचा आवाज उठवतील, असं चौधरी यांनी यावेळी सांगितले.